
हिंदुस्थानात फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आलेली कोरोनाची दुसरी लाट तीन महिन्यांनंतर काहीशी कमी होताना दिसत आहे. मे महिन्याच्या दुसऱया आठवडय़ापासून कोरोना रुग्णांच्या संख्येत बऱयापैकी घट होऊ लागली असून पुढील दोन आठवडय़ांत कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा अंदाज सफदरजंग रुग्णालयातील कम्युनिटी मेडिसिन विभागाचे प्राध्यापक आणि मुख्य डॉक्टर जुगल किशोर यांनी वर्तविला आहे.
देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे. हे कोरोनाविरोधात योग्य पद्धतीने लढत असल्याचे संकेत आहेत. कोरोना सक्रिय रुग्णांच्या संख्येत जसजशी घट होईल तसतसा दुसऱया लाटेचा प्रकोपही कमी होईल. जर सारे काही व्यवस्थित घडले तर कोरोनाची दुसरी लाट कमाल दहा दिवसांपासून ते दोन आडवडय़ांदरम्यान संपुष्टात येण्याची शक्यता असल्याचे डॉ. जुगल किशोर सांगतात.
सक्रिय रुग्णांचे प्रमाण कमी होणे हे रुग्णांचे कॉण्टॅक्ट कमी होत असल्याचे पुरावे आहेत. यामधील काही जण हे औषधांच्या माध्यमातून तर काहीजण प्रबळ प्रतिकारशक्तीमुळे कोरोनामधून बरे झाले असल्याचे डॉ. किशोर यांनी सांगितले.
कोरोना नियमांचे कठोर पालन
कोरोनाची दुसरी लाट थोपविण्यासाठी कोरोना नियमांचे कठोरपणे पालन करणे गरजेचे आहे. जर रस्त्यांवर लोकांची गर्दी कायम राहिली, मास्कचा वापर केला नाही तर दुसरी लाट ओसरण्याचा कालावधी तेवढय़ाच अधिक प्रमाणात वाढण्याची भीतीदेखील डॉ. जुगल किशोर यांनी व्यक्त केली.



























































