
सध्या कोरोनामुळे थिएटर बंद आहेत. त्यामुळे ओटीटी प्लॅटफॉर्मची व्रेझ वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत बॉलिवूडमधील कलाकार वेबसिरीजकडे वळताना दिसत आहेत. या वर्षीही काही मोठे सितारे ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करतील. माधुरी दीक्षित, अजय देवगण, सोनाक्षी सिन्हा, शाहिद कपूर, अक्षय खन्ना डिजिटल मंच गाजवण्यासाठी सज्ज झाले आहेत.
बॉलिवूडची ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित ‘फाइंडिंग अनामिका’ नावाच्या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. माधुरीची ही पहिली वेबसिरीज आहे. नेटफ्लिक्सच्या या सिरीजमध्ये माधुरीसोबत संजय कपूर, मानव काैर यांच्या प्रमुख भूमिका असतील. माधुरीने ‘फाइंडिंग अनामिका’चा फर्स्ट लूक नुकताच शेअर केला.
अभिनेता अजय देवगण लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. अजयची ‘रुद्रा’ ही वेबसिरीज हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. ‘लुथर’ या ब्रिटिश सिरीजचा हा हिंदी रिमेक असून तो एक सायकोलॉजिकल ड्रामा आहे. याशिवाय सोनाक्षी सिन्हाची ‘फॉलन’ ही वेबसिरीज येत आहे. त्यात एका डॅशिंग पोलीस अधिकाऱयाच्या भूमिकेत सोनाक्षी दिसेल. याशिवाय अभिनेता शाहिद कपूरदेखील अॅमेझॉन प्राईमची वेबसिरीज करणार आहे. या वेबसिरीजचे नाव निश्चित झालेले नाही. अक्षय खन्ना हा अभिनेतादेखील डिजिटल डेब्यूसाठी सज्ज झाला आहे. अक्षयच्या ‘लेगेसी’ या वेबसिरीजचे शूटिंग जवळपास पूर्ण झाले आहे. थोडय़ा भागांचे शूटिंग लॉकडाऊनमुळे थांबले आहे.
दमदार कंटेंटची पर्वणी
या वर्षी नेटफ्लिक्स, हॉटस्टार, अॅमेझॉन यासारख्या डिजिटल मंचावर रसिकांना वेबसिरीजची पर्वणी मिळणार आहे. कलाकारांच्या डेब्यू सिरीजव्यतिरिक्त अन्य दमदार कंटेंटच्या सिरीजही येणार आहेत. यात आर. माधवन आणि सुरवीन चावला यांची ‘डिकपल’ ही नेटफ्लिक्स सिरीज, ‘अर्यानक’ ही रवीना टंडन आणि आशुतोष राणा यांची सिरीज आहे. ‘स्पॅम-1992’ या सिरीजच्या दमदार यशानंतर हंसल मेहता यांची ‘स्पॅम-2003’ ही रसिकांसाठी पर्वणी असेल. स्टॅम्प घोटाळ्यातील प्रमुख आरोपी अब्दुल करीम तेलगीची ही कहाणी आहे. याशिवाय सनी लिओनीची ‘अनामिका’, शेफाली शहा आणि कीर्ती कुल्हारी यांची ‘ह्युमन’ या सिरीज येणार आहेत.



























































