
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात दिलेल्या निर्णयाने आता आरक्षणाचा निर्णय हा केंद्र सरकारच घेऊ शकते हे स्पष्ट झालेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदनही दिले आहे. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येण्याची शक्यता आहे. तेव्हा भाजप नेत्यांनी पंतप्रधानांची भेट घ्यावी आणि 50 टक्के आरक्षणाची मर्यादा शिथिल करून मराठा समाजाला दिलासा देण्याची मागणी करावी, अशी भूमिका मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी आज मांडली.
मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आज सह्याद्री अतिथिगृह येथे पार पडली. बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी माहिती दिली. त्याचप्रमाणे भाजपकडून सुरू असलेल्या राजकारणाबाबतही त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले, ही समिती मराठा आरक्षण कसे टिकवावे, याबाबत काही सकारात्मक सूचना मांडण्यासाठी गठीत झाली असावी असा आमचा समज होता. परंतु, ही समिती विधायक सूचना करण्यासाठी नव्हे तर आंदोलने करण्यासाठी स्थापन झाल्याचे दिसून येते आहे. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वेच्च न्यायालयाने सुनावला आहे. त्यामुळे भाजप नेमके कोणाविरुद्ध आंदोलन करते आहे, असा प्रश्न उपस्थित करून अशोक चव्हाण यांनी भाजपला राजकारण नव्हे तर सहकार्य करण्याचे आवाहन केले.
या बैठकीला उपसमितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सिताराम कुंटे, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव शाम तागडे, सामान्य प्रशासन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, विधी व न्याय विभागाचे सचिव व विधी सल्लागार संजय देशमुख, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील आदी अधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
मराठा आंदोलनाला भाजपने राजकीय रंग देऊ नये – विनोद पाटील
मराठा आरक्षणाचा विषय केंद्र सरकारकडे गेला आहे तर मग राज्याच्या भाजपा नेत्यांनी या विषयाचा पाठपुरावा करायला हवा. सध्या आंदोलनाचा काळ नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव जीवघेणा आहे. त्यामुळे आता राजकीय मतभेद विसरून एकत्र येण्याची ही वेळ आहे. भाजपाने यासाठी पुढाकार घ्यायला हवा. भाजपाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जरूर या आंदोलनामध्ये सहभागी व्हावं, त्यांचं स्वागत आहे. मात्र, त्यांनी वैयक्तिकरित्या यावं, पक्ष म्हणून येऊ नये. भाजपाने समाजाच्या आरक्षणासाठीच्या आंदोलनाला राजकीय रंग देऊ नये, अशा शब्दांत मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक विनोद पाटील यांनी भाजप नेत्यांना सुनावले आहे.
भाजप मराठा आंदोलनाला पाठिंबा देणार
मराठा आरक्षणाविषयी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक सुरू असताना भाजपने यासंदर्भात नुकत्याच नेमलेल्या समितीची बैठकीही आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी पार पडली. भारतीय जनता पार्टीने मराठा समाजाला पुन्हा आरक्षण मिळवून देण्यासाठी आणि आंदोलनासाठी पूर्णपणे पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. या बैठकीची माहिती देताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजपातर्फे सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली तज्ञांची समिती नेमून न्यायालयाच्या निकालामध्ये व मराठा आरक्षणाच्या बाबतीत नेमके काय झाले आहे आणि ही जबाबदारी पूर्णपणे राज्य शासनाची कशी आहे याचा अहवाल आम्ही तयार करत आहोत. त्याची मांडणी राज्यपालांकडे करणार आहोत. राज्यपालांनी राज्याचे संवैधानिक प्रमुख म्हणून महाविकास आघाडी सरकारला राज्याची दिशाभूल करू देऊ नये, असे सांगण्याची विनंती करणार आहोत.
- मराठा आरक्षणाबाबत सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशामुळे रखडलेल्या नोकरभरती प्रक्रियेबाबत मुख्य सचिव विभागनिहाय आढावा घेत आहेत. पुढील दोन-तीन दिवसांत त्यांचा अहवाल अपेक्षित आहे. त्यानंतर या नोकरभरतीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.
- मराठा आरक्षणाबाबत सर्वेच्च न्यायालयाच्या निकालाचा सखोल अभ्यास करून पुढील कायदेशीर पर्यायांबाबत शिफारस करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या विधीतज्ञांच्या समितीचे कामकाज सुरू झाले आहे. येत्या 31 मे पूर्वी त्यांचा अहवाल प्राप्त होणार आहे.
- मराठा समाजासाठी राज्य मंत्रिमंडळाने 22 सप्टेंबर 2020 रोजी घेतलेल्या निर्णयांच्या अंमल– बजावणीचाही आजच्या बैठकीत आढावा घेण्यात आला. मराठा समाजासाठी जाहीर झालेली शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती, वसतीगृह संदर्भातील सवलती यापुढेही सुरू राहतील.
































































