
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छुक असणाऱया तरुण-तरुणींना हेल्थकेअर, मेडिकल, नार्ंसग व डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामध्ये काैशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यासाठी राज्यात मुख्यमंत्री महाआरोग्य काैशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार असून 20 हजार युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाईल, अशी माहिती काैशल्य विकासमंत्री नवाब मलिक यांनी आज येथे दिली.
यासंदर्भातील सविस्तर शासन निर्णय आज जारी करण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय इस्पितळे तसेच वैद्यकीय शिक्षण संस्था यांची ग्रीन चॅनेलद्वारे व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करून त्यांची निवड करण्यात येईल. तसेच ज्या खासगी इस्पितळांमध्ये 20 पेक्षा अधिक बेड्स आहेत त्यांचीही व्यावसायिक प्रशिक्षण संस्था म्हणून नोंदणी करून निवड करण्यात येईल. या संस्थांमार्फत युवक-युवतींना प्रशिक्षण दिले जाईल.
वाहनचालक, अॅम्बुलन्स वाहनचालक अभ्यासक्रमाचाही समावेश
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आवश्यक वैद्यकीय सुविधांची ने-आण करण्यासाठी प्रशिक्षणामध्ये वाहनचालक तसेच अॅम्बुलन्स वाहनचालक या अभ्यासक्रमाचाही समावेश असेल. प्रशिक्षण पूर्ण करणाऱया सर्व प्रशिक्षणार्थींची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत सक्षम यंत्रणेमार्फत पॅरामेडिकल काैन्सिलमध्ये करण्यात यावी, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य विभागास देण्यात आल्या आहेत. प्रशिक्षण पूर्ण करणाऱया सर्व प्रशिक्षणार्थींना त्यांची सेवा किमान 6 महिने शासकीय किंवा खासगी इस्पितळांना देणे अनिवार्य असेल.





























































