इनाम व वतन जमिनीवरील अकृषिक बांधकामे नियमित करण्यासाठी सवलत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
mantralaya-5

राज्यातील इनाम व वतन जमिनीवरील अकृषिक (एनए) बांधकामे नियमित करण्यासाठी जनतेला सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्र गुंठेवारी विकास (नियमाधीन करणे, श्रेणीवाढ व नियंत्रण) अधिनियम, 2001 या कायद्यांतर्गत इनाम व वतन जमिनींवरील विकास नियमित करताना प्रशमन शुल्क व विकास आकार या रकमेबरोबरच संबंधित जमिनींच्या प्रचलित बाजार मूल्याच्या 75 टक्के रक्कम शासनाकडे भरणा करावी लागत होती. पण यामध्ये लोकांना सवलत देण्याच्या दृष्टिकोनातून प्रचलित बाजार मूल्याच्या 75 टक्क्यांऐवजी 25 टक्के रक्कम आकारून व नियमित प्रशमन शुल्क आणि विकास आकार वसूल करून अशा जमिनीवरील गुंठेवारी विकास नियमित मंजुरी देण्यात आली आहे. त्याबाबतचा अध्यादेश लवकरच काढण्यात येईल.

नवीन अविभाज्य शर्थींने दिलेल्या इनाम व वतन (महार वतन व देवस्थान जमीन वगळून) जमिनी ज्या भोगवटादार वर्ग-दोनच्या आहेत त्यांच्यावरील अकृषिक बांधकामे गुंठेवारी कायद्यांतर्गत नियमित करण्यासाठी अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय घेतल्यामुळे अनेकांना फायदा होईल.

सिंधुदुर्गात औषध वनस्पती संस्थेला जमीन

आयुष मंत्रालयाअंतर्गत नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिनल प्लाण्टस् ही संस्था सिंधुदुर्ग जिह्यातील दोडामार्ग तालुक्यातील अडाळी येथे स्थापन करण्याच्या केंद्र शासनाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आहे. यासाठी 50 एकर जागा देण्यात येईल. या प्रस्तावास मान्यता देण्यात आली. अडाळी येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांची 50 एकर जागा ही संस्था स्थापन करण्यासाठी केंद्र सरकारच्या आयुष मंत्रालयाला ही जमीन कब्जा हक्काने विनामूल्य हस्तांतरित करण्यात येईल. राज्यात राष्ट्रीय औषधी वनस्पती संस्थेच्या स्थापनेमुळे स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील.

ग्रामसेवकांचा प्रवास भत्ता वाढणार

जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक व ग्राम विकास अधिकाऱयांच्या कायम प्रवास भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. हा भत्ता आता दीड हजार रुपये होणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील मूलभूत गरजा पुरविण्याची जबाबदारी ग्रामपंचायतीची असून त्यात ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱयांची महत्त्वाची भूमिका असते. पंचायत समिती स्तरावर, जिल्हा परिषद स्तरावर, महसूल विभागात जिल्हाधिकारी कार्यालयात, विभागीय आयुक्त कार्यालयात ग्रामसेवक-ग्रामविकास अधिकाऱयांना बैठकांना हजर राहावे लागते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.