
रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार बाळ बोठे याच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. पारनेर येथील कारागृहात कैद्यांकडे सापडलेल्या मोबाईलवरून काही कॉल केल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे या प्रकरणामध्येही बोठे याला आरोपी करण्यात येणार आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांनी दिली.
गेल्या महिन्यात उपअधीक्षक पाटील, तहसीलदार ज्योती देवरे, पोलीस निरीक्षक घनश्याम बळप यांनी पारनेर उपकारागृहाची झडती घेतली होती. याकेळी कारागृहातील आरोपी सौरभ पोटघन व अविनाश कर्डिले यांच्या झडतीत दोन मोबाईल आढळले होते. त्यांना जेवण देणारे सुभाष लोंढे, प्रवीण देशमुख (रा. सुपा, ता. पारनेर) यांनी हे मोबाईल आरोपींना दिले होते. यामुळे पोलिसांनी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
ज्या बराकीत मोबाईल सापडले, तेथे बाळ बोठेला ठेवण्यात आले होते. यामुळे बोठेने ‘त्या’ मोबाईलचा वापर केल्याचा संशय पोलिसांना होता. त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तपास केला असता बोठे याने ‘त्या’ मोबाईलवरून कॉल केल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे बोठेला या गुन्ह्यातही आरोपी केले जाणार आहे. मोबाईलद्वारे त्याने कोणाला फोन केले, काय संभाषण झाले, याचा तपास पोलीस करीत आहेत.
































































