वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद; पंतप्रधान मोदी भावुक झाले, कंठ दाटला!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी वाराणसीतील डॉक्टरांशी संवाद साधला. यावेळी कोरोना महामारीत प्राण गमावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहताना ते खूप भावुक झाले. विषाणूने आपल्या जवळच्या माणसांना आपल्यापासून हिरावून नेले आहे. मी या सर्वांना श्रद्धांजली वाहतो, त्यांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो, अशी भावना व्यक्त करताना त्यांचा कंठ दाटून आला होता.

मोदींनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून वाराणसीतील डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ तसेच फ्रंटलाईन आरोग्य कर्मचाऱयांशी संवाद साधला. मी काशीचा सेवक असल्याच्या नात्याने काशीतील प्रत्येक नागरिकाला धन्यवाद देत आहे.  कोरोनाच्या दुसऱया लाटेत आपल्याला अनेक स्तरांवर एकत्रित लढावे लागत आहे. यावेळचा संक्रमण दर आधीपेक्षा कित्येक पटीने अधिक आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेकर प्रचंड ताण पडला आहे, असेही मोदींनी नमूद केले. कोरोना काळात वाराणसीतील नागरिक आणि अधिकाऱयांशी व्हर्चुअल संवाद साधण्याची त्यांची ही सातवी वेळ होती.

जेथे रुग्ण, तेथे उपचार!

पंतप्रधान मोदींनी देशाच्या कोरोना लढय़ात ‘जेथे रुग्ण, तेथे उपचार’ हा नवा मंत्रही दिला आहे. जितके आपण लोकांजवळ उपचार घेऊन पोहोचू, तेवढा आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी होईल, असे ते म्हणाले. आपण लसीच्या सुरक्षेकडेही लक्ष दिले आहे. त्यामुळेच  फ्रंटलाईन वर्कर्स अधिक प्रमाणात सुरक्षित राहून लोकांची सेवा करीत आहेत. लसीचे हेच सुरक्षा कवच येत्या काळात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल. आपली वेळ येईल, त्यावेळी आपल्याला लस अवश्य टोचून घ्यायची आहे, असे आवाहन केले.

‘ब्लॅक फंगस’चे नवे आव्हान

देशातील कोरोना संकटाची चिंता कमी झाली नसतानाच गेल्या काही दिवसांपासून ‘ब्लॅक फंगस’चे नवे आव्हान उभे ठाकले आहे. यावर मात करण्यासाठी आपल्याला सावधगिरी आणि आवश्यक व्यवस्थेवर लक्ष दिले पाहिजे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले.