विकासकामांवर आता ‘निसर्ग’ समितीचे लक्ष, मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला स्पष्ट आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विकासाला आमचा विरोध नाही, पण तो पर्यावरणस्नेहीच असावा, असे ठामपणे सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विकास कामे करताना निसर्गाची जपणूक कशी करावी याचा शास्त्र्ााrय व तांत्रिक सल्ला देणारी समिती स्थापन करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. विकासक आणि प्रशासन या दोघांनाही या समितीचा सल्ला बंधनकारक असेल, असेही मुख्यमंत्र्यांनी बजावले.

आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाच्या निमित्ताने वन विभागाने आयोजित केलेल्या वेबिनारमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते.

गेल्या वर्षी ‘निसर्ग’ चक्रीवादळ आले, या वर्षी ‘तौकते’ चक्रीवादळ आले. चक्रीवादळ आले की आपण हवामान बदलाचे कारण सांगतो. पण हवामान बदल होण्यास कोणत्या गोष्टी कारणीभूत आहेत याचा आपण गांभीर्याने विचार करणार आहोत का, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.

पर्यावरणाचा ऱहास नको!

आपण विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा ऱहास करत चाललो आहोत. त्यामुळेच जंगलाचा ऱहास करून विकासकामांचे प्रस्ताव जेव्हा आपल्यासमोर येतात तेव्हा त्याला आपला विरोध असतो. याचा अर्थ आपला विकासाला विरोध आहे असं नाही, तर निसर्गस्नेही विकासाची संकल्पना आपल्याला मान्य आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

आजच्या युवा पिढीमध्ये निसर्ग, जैवविविधता याविषयी प्रचंड रस आहे. ते या क्षेत्रात अभ्यास करून, संशोधन करून पुढे जाऊ इच्छितात. अशा सर्व युवकांना सहकार्य आणि पाठिंबा देण्याची गरज आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुंबईत जैवविविधता

शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेल. आरेचे जंगल आपण वाचवले. शहरात जंगल आणि या जंगलामध्ये प्रचंड जैवविविधता असलेले आरेचे क्षेत्र आपण जपले. जगात अशाप्रकारे शहरात जैवविविधता असलेले मुंबई हे कदाचित एकमेव महानगर असेल, असेही ते म्हणाले.

‘चळवळ जैवविविधता संवर्धनाची, वाटचाल जैवविविधता मंडळाची’ या माहितीपटाचे अनावरण यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेषराव पाटील यांनी मंडळाच्या कामाची माहिती दिली.

लक्ष्मणरेषा ओलांडू नये

निसर्ग अजूनही आपल्याकडे मातृत्वाच्या भावनेने पाहतो आणि आपल्याला जपतो आहे. पण लक्ष्मण रेषा ओलांडली की काय होते, हे कोरोना विषाणुने दाखवून दिले आहे, असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.