बाळासाहेब ठाकरे आयएएस ऍकेडमीतर्फे विशेष मार्गदर्शन, तब्बल 160 विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमीतर्फे लोकसेवा आयोगाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीकरिता दिल्लीला जाणाऱया उमेदवारांसाठी विशेष मार्गदर्शन शिबीर नुकतेच पूर्ण झाले आहे. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सनदी अधिकाऱयांकडून उमेदवारांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्यात आले असून यात एकूण 160 जणांनी सहभाग नोंदविला.

राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्याने आणि शिव विद्या प्रबोधिनी ‘बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमीचे’ संस्थापक विजय कदम यांच्या पुढाकाराने हा उपक्रम राबविला गेला. 24 एप्रिल ते 21 मे या कालावधीत हे मार्गदर्शन करण्यात आले आहे. यात रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, सिडकोचे उपाध्यक्ष व व्यवस्थापक संचालक संजय मुखर्जी, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ.पी. गुप्ता, पर्यावरण विभागाचे प्रधान सचिव मनिषा म्हैसकर, मुंबई पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील, पोलीस सहआयुक्त यशस्वी यादव, सहाय्यक पोलीस आयुक्त चैतन्य, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर या सनदी अधिकाऱयांनी यावेळी उमेदवारांना मार्गदर्शन केले आहे.

बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकडेमीतर्फे सुरू करण्यात आलेला हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरत असून अधिकाअधिक सनदी अधिकाऱयांच्या मार्गदर्शनाची विनंती विद्यार्थ्यांकडून केली जात असल्याची माहिती शिव विद्या प्रबोधिनी बाळासाहेब ठाकरे आयएएस अॅकेडमीचे संस्थापक संचालक विजय कदम यांनी दिली.