
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी दिवसरात्र राबणाऱ्या पोलिसांना होणारा कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्रिसुत्री धोरण राबविले आहे. प्रत्येक पोलीस ठाण्यांतर्गत कर्मचाऱ्यांची टेस्टिंग, ट्रेसिंग आणि तत्काळ ट्रिटमेंट गोष्टींवर भर दिला. त्यामुळे पोलीस दलातील कोरोना संसर्गाचे प्रमाण झपाट्याने कमी झाले आहे. त्यानुसार साडेआठ हजारांवर असलेल्या पोलीस मनुष्यबळातील आता अवघ्या 200 कर्मचाऱ्यांनाच कोरोनाचा संसर्ग असल्याचे निष्पन्न झाले आहे. दरदिवशी कर्मचाऱ्यांना होणारा संसर्ग कमी झाल्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
शहरात मागील काही दिवसांपासून कोरोनाचा वेग झपाट्याने वाढला आहे. त्यामुळे नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि बंदोबस्त करताना पोलीस दलातील कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. कोरोना लसीकरणानंतरही संसर्गाचे प्रमाण वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात होती. त्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी धोरण तयार केले. त्यानुसार, आयुक्तालयासह प्रत्येक पोलीस ठाण्यांमधील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या कोरोना चाचण्या करण्यास प्रारंभ केला. त्यानंतर प्राप्त अहवालानुसार, बाधित कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात आले. त्याशिवाय त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाही घरीच थांबण्यासाठी सांगण्यात आले. कर्मचाऱ्यांचे ट्रेसिंग केल्यानंतर त्यांची तपासणी आणि तत्काळ उपचार केल्यामुळे संसर्ग कमी होण्यास मदत झाली आहे.
खबरदारीचा उपाय म्हणून शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील पोलीस रुग्णालयात 10 ऑक्सिजन बेडची सोय करण्यात आली आहे. त्याशिवाय कोरोनाबाधित कर्मचाऱ्यांना धीर देऊन त्यांच्या कुटूंबियांची चाचणी करण्यास प्राधान्य देण्यात आले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी संसर्ग झालेल्या पोलिसांचा आकडा 300 वर गेला होता. मात्र, आता त्रिसूत्री धोरणामुळे पोलीस दलातील कोरोनाबाधितांची संख्या 200 पर्यंत खाली आणण्यात प्रशासनाला यश आले आहे. अधिकाऱ्यांसह पोलीस दलातील कर्मचारी संख्या 8 हजार 644 आहे. आतापर्यंत 2 हजार 273 पोलिसांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी 18 पोलिसांना जीव गमवावा लागला आहे.
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रयत्न
पोलीस दलातील अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांमध्ये वाढत्या कोरोना संसर्गामुळे टेस्टिंग, ट्रेसिंग आणि तत्काळ उपचाराला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे अनेकांना संसर्ग होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. सद्यस्थितीत लसीकरणावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार कोरोनो संसर्गापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त
लसीकरणात ग्रामीण पोलीस दलही आघाडीवर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणात पुणे ग्रामीण पोलीस दल आघाडीवर आहे. आतापर्यंत 97 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. त्यामध्ये 200 अधिकारी आणि 2 हजार 431 कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख स्वतः लसीकरणाच्या प्रक्रियेवर लक्ष दिले आहे. त्यानुसार जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांचे लसीकरण पुर्ण करण्यावर प्राधान्य दिला आहे. आतापर्यंत ग्रामीण पोलीस दलात 69 अधिकारी व 533 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.



























































