दिल्ली डायरी – केरळमध्ये डाव्यांची घराणेशाहीची ‘जपमाळ’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

केरळमध्ये विजयन यांच्या नेतृत्वाखाली डाव्यांचे सरकार पुन्हा स्थापन झाले. तेथील काँग्रेस आणि डावे यांचे आलटून-पालटून सरकार देण्याची प्रथा यावेळी मोडीत निघाली. सोन्याच्या भ्रष्टाचाराचे आरोप असलेले मुख्यमंत्री विजयन दुसऱयांदा जनतेने दिलेल्या संधीचे सोने करतील असे वाटले होते. मात्र त्याऐवजी त्यांनी नवीन मंत्रिमंडळ बनविताना अनेक कार्यक्षम चेहऱयांना वगळून घराणेशाहीचा धक्कादायक राग आळविला. ‘जावई माझा भला’ असे म्हणत या महाशयांनी मोहम्मद रियाझ या आपल्या जावयाचाही मंत्रिमंडळात समावेश केला आहे. माकपाचे राज्य सचिव विजय राघवन यांच्या पत्नी आर. बिंदू तसेच आणखी एका नेत्याची पत्नी वीणा जॉर्ज यांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. मात्र कोरोना काळात प्रभावी काम केल्यामुळे जगभरात ज्यांच्या नावाचा डंका वाजला त्या आरोग्यमंत्री शैलजा टीचर यांच्या लोकप्रियतेला घाबरून मुख्यमंत्री विजयन यांनी त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचे कोते राजकारण खेळले.

केरळच्या नव्या सरकारच्या निमित्ताने डाव्यांचे महिला सबलीकरण आणि घराणेशाहीविरुद्धचे ढोंग उघडे पडले आहे. जगभरातल्या महिला सबलीकरणावर एरव्ही तावातावाने बोलणाऱया डाव्यांची महिला नेत्यांवर अन्याय करण्याची परंपरा खूप देदीप्यमान व लांबलचक आहे. महिला सबलीकरणासाठी अहर्निश झटलेल्या गीता मुखर्जींपासून ते शैलजा टीचर यांच्यापर्यंत ही परंपरा सांगता येईल. 1987 मध्ये तर डाव्यांनी केरळात आर. गौरी या महिला नेत्याला मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवले होते, मात्र निवडणूक जिंकल्यानंतर गौरी यांचा पत्ता साफ करून डाव्यांनी पुरुष नेत्याच्या हाती मुख्यमंत्रीपदाची सूत्रे दिली होती. त्यामुळे दुटप्पीपणा हा काही डाव्यांसाठी नवा नाही. प्रश्न इतकाच की, डावे इतर पक्षांच्या घराणेशाही आणि महिला सबलीकरणावर असे काही तावातावाने बोलतात की, या दोन्ही विषयाचे होलसेल ठेकेदार आपणच आहोत असा एकंदरीच डाव्यांचा तोरा असतो. वास्तविक केरळातील ही निवडणूक डाव्यांनी जिंकली ती विरोधी पक्षाच्या कर्मदरिद्रीपणाबरोबरच शैलजा या महिला आरोग्यमंत्र्यांनी केलेल्या दणदणीत कामगिरीच्या जोरावर! देशात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला. तेव्हापासून शैलजा यांनी अत्यंत काटेकोरपणे दिवसरात्र मेहनत घेत कोरोनाच्या तडाख्यातून केरळला वाचवले. विदेशातून केरळमध्ये येणाऱया नागरिकांची संख्या मोठय़ा प्रमाणावर असल्याने शैलजा यांचे हे यश डोळ्यात भरणारेच आहे, मात्र हे यश विजयन यांच्या डोळ्यात सलले. कोरोनाविरुद्धच्या ‘शैलजा मॉडेल’ची चर्चा केवळ देशभरातच नाही तर जगभरात सुरू असताना आणि शैलजा यांच्यावर जगभरातून स्तुतिसुमने उधळली जात असताना ज्यांच्या कामाच्या जोरावर केरळ जिंकले त्या शैलजांनाच मंत्रिमंडळातून वगळण्याचा करंटेपणा केला आहे.