15 अतिगंभीर बालरुग्णांनी कोरोनाला हरवले, एक वर्षाच्या मुलाचादेखील होता समावेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या दुसऱया लाटेत लहान मुलांना अधिक फटका बसल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे अनेकांसमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र संभाजीनगरमधील रुग्णालयातील एका वृत्ताने बालरुग्णदेखील कोरोनावर यशस्वीरीत्या मात करू शकतात हे दाखवून दिले आहे. संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात तब्बल 15 अतिगंभीर बालरुग्णांनी कोरोनावर यशस्वीरीत्या मात केली आहे. मुख्य म्हणजे कोरोनावर मात करणाऱया बालरुग्णांचा सीटीस्कोर हा 8 ते 14 च्या घरात असल्याची माहितीदेखील पुढे आली आहे.

संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयात या 15 बालरुग्णांना दाखल करण्यात आले हेते. रुग्णालयाच्या डॉ. पी. एम. जाधव, अधिष्ठाता डॉ. राजेंद्र बाहेरा, उपअधिष्ठाता डॉ. प्रवीण सूर्यवंशी, बालरुग्ण अतिदक्षता विभागाचे डॉ. विनोद इंगळे यांनी याबाबत पत्रकारांशी संवाद साधताना याबद्दल सविस्तर माहिती दिली. या सर्व बालरुग्णांच्या उपचारासाठी डॉ. विनोद इंगळे, बालरोगतज्ञ डॉ. माधुरी एंगडे, बालरक्तविकार व कर्करोगतज्ञ डॉ. तुषार इधाटे, नवजात शिशुतज्ञ डॉ. सुनील गव्हाणे, डॉ. अंजली काळे यांच्या टीमने विशेष प्रयत्न केले.

रुग्णालयात दाखल
15 बालरुग्णांपैकी एका बालरुग्णाचे वय अवघे 13 महिने होते. त्याचा एचआरसीटी स्कोर 14 इतका होता.

तर काही बालरुग्णांचे एचआरसीटी स्कोर 4 ते 8 च्या दरम्यान होते. त्यांच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

काही बालरुग्णांच्या डोक्यात ताप गेला होता. त्यातून त्यांच्या मेंदूला सूजदेखील आली होती. बालरुग्णांच्या हृदयाभोवती, फुप्फुसाभोवतीदेखील पाणी जमा झाले होते. अशा गंभीर परिस्थितीतदेखील त्यांच्यावर उपचार करण्यात आले आहेत.