
टॅक्सीचालकाने भाडे नाकारण्यावरुन प्रवासी आणि टॅक्सीचालकांमध्ये होणारे भांडण यात काही नवीन नाही. पण हा वाद विकोपाला जावून दादरमध्ये एका फळविक्रेत्याने टॅक्सी चालकाच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घालून हत्या केल्याची खळबळजनक घटना रविवारी घडली. छबीलाल जैस्वार (55) असे या मृत टॅक्सीचालकाचे नाव आहे. दादर मार्केटमधील कबुतरखाना येथे सकाळी 6 च्या सुमारास छबीलाल जैस्वार हे टॅक्सी घेऊन आले होते. या दरम्यान फळविक्रेते बसवराज मेलिणामनी जवळ जायचे आहे, असे सांगितले. मात्र जवळचे भाडे असल्याने छबीलाल यांनी त्याचे भाडे नाकारले. त्यामुळे त्यांच्या बाचाबाची देखील झाली. हा वाद इतका विकोप्याला गेला की, बसवराजने जवळच असणाऱ्या सिमेंटचा पेव्हर ब्लॉक उचलला आणि छबीलालच्या डोक्यात घातला. यात छबीलाल यांचा जागीच मृत्यू झाला.






















































