
‘निसर्ग’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीच्या निकषावर ‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना मदत देण्याचा निर्णय महाराष्ट्र विकास आघाडीने घेतला आहे. एनडीआरएफच्या निकषाच्या पलीकडे जाऊन ‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांना 250 कोटी रुपयांचे पॅकेज देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, अशी माहिती मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दै. ‘सामना’शी बोलताना आज दिली.
‘तौकते’ चक्रीवादळाने मुंबई शहर, मुंबई उपनगर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर व ठाणे जिह्याला जबरदस्त तडाखा दिला. यामध्ये मच्छीमार तसेच कोकणातील शेतकऱयांचे आंबा-काजूच्या बागांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, ‘तौकते’ चक्रीवादळग्रस्तांच्या मदतीसाठी जीआर लवकरच काढण्यात येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे. एनडीआरएफच्या निकषानुसार ‘तौकते’ चक्रीवादळात 72 कोटी रुपयांचे नुकसान आहे. पण या निकषाच्या पलीकडे जाऊन महाराष्ट्र सरकारने 250 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे. भविष्यातील वादळांचा मुकाबला करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचाही निर्णय झाला आहे. त्यासाठी कोकण किनारपट्टीवरील गावांमध्ये विजेच्या भूमिगत वायर टाकण्यात येणार आहेत, निवारेही बांधण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिशय सकारात्मक भूमिका घेऊन या सर्व कामांची आवश्यकता वर्तवली असून त्यांचे प्रस्ताव मागवले आहेत, असे वडेट्टीवार म्हणाले.



























































