
फोन टॅपिंग प्रकरणात अखेर आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यात आला. जबाब नोंदवण्यासाठी बीकेसी सायबर पोलिसांचे पथक जबाब नुकतेच हैदराबादला गेले होते. तर यापूर्वी चौकशीला गैरहजर राहिल्याने रश्मी शुक्ला याना मुंबई सायबरने दोन वेळेस समन्स बजावले होते.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या प्रमुख असताना रश्मी शुक्ला यांनी काही प्रमुख व्यक्ती आणि मंत्र्यांचे फोन टॅप करून पोलीस दलात ट्रान्सफर पोस्टिंगचे रॅकेट चालत असल्याचा अहवाल तयार केला होता. फोन टॅपिंग प्रकरणात भारतीय टेलिग्राफ अॅक्ट कलम 30 माहिती व तंत्रज्ञान कायद्यानुसार आणि ऑफिशियल सिक्रेट अॅक्ट 05 नुसार बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्या गुह्याच्या तपासासाठी सायबर पोलिसांनी रश्मी शुक्ला याना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
शुक्ला या सध्या केंद्रात प्रतिनियुक्तीवर असून त्या केंद्रीय राखीव पोलीस दलात अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत आहेत. कोरोना काळात आपल्याला मुंबईला येणे शक्य नसल्याने ई-मेलद्वारे प्रश्न पाठवावे अशी मागणी शुक्ला यांनी केली होती. तर पोलीस चौकशीला बोलावत असल्याने शुक्ला यांनी न्यायालयातदेखील धाव घेतली होती. न्यायालयाने रश्मी शुक्ला यांचा पोलिसांना जबाब नोंदवण्यास परवानगी दिली होती. शुक्ला यांचा जबाब त्याच्या वकिलासमोर नोंदवून त्याची व्हिडीओग्राफी करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. नुकतेच बीकेसी सायबर पोलिसांचे पथक हैदराबादला गेले होते. या पथकाने रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला आहे. पुढील कारवाईसाठी मुंबई पोलीस हे तांत्रिक पुरावे गोळा करत आहेत.





























































