
सातारा जिल्ह्यात कोरोनाची स्थिती चिंताजनक झाल्यामुळे जिल्हा प्रशासनाने आजपासून 1 जूनपर्यंत कडक लॉकडाऊन जारी केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याकरिता आज सूर्योदयापासूनच पोलीस यंत्रणा रस्त्यावर उतरली. त्यामुळे दिवसभर संपूर्ण जिल्ह्यात रस्ते निर्मनुष्य राहिले आणि सर्वत्र शुकशुकाट पाहायला मिळाला.
दररोजच रुग्णवाढीचे धडकी भरवणारे आकडे येत असल्यामुळे सातारा जिल्हा रेड झोनमध्ये गेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आजपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन लावण्यात आला आहे. त्याची कडक अंमलबजावणी व्हावी म्हणून सर्वत्र कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहरे आणि लहान लहान गावातही रस्ते आणि गल्ल्या बांबूचे अडथळे लावून बंद केल्या आहेत. वाहनांची तपासणी केली जात आहे. त्यामुळे वाहनांची वर्दळ थांबली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱयांवर कारवाईचा धडाका सुरू आहे.
सातारा शहर तसेच कराड, फलटण, वाई, महाबळेश्वर, कोरेगाव, पुसेगाव, दहिवडी, म्हसवड, पाटणसह जिल्ह्यात सर्वत्र कडक लॉकडाऊनचा प्रभाव दिसत आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आजपासून सुरू झालेल्या सात दिवसांच्या कडक लॉकडाऊनला कराडसह परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पोलीस प्रशासनाने शहरात येणाऱया मार्गावरील अनेक चौकात चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांनी विनाकारण फिरणाऱया नागरिकांसह दुचाकीस्वार, विनामास्क फिरणाऱयांवर दंडात्मक कारवाई करून दुचाकी ताब्यात घेतल्या. मलकापूर, ढेबेवाडी फाटा, पाटण तिकाटणे, कोल्हापूर नाका, कार्वे नाका, कृष्णा नाका, सैदापूर कॅनॉल या ठिकाणी शुकशुकाट होता.
विनाकारण फिरणारे 15 जण आढळले कोरोनाबाधित
सातारा येथे शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे क कस्तुरबा गांधी आरोग्य केंद्राचे डॉ. दीपक थोरात यांच्या उपस्थितीत करंजे नाका येथे किनाकारण फिरणाऱयांची कोरोना टेस्ट करण्याची मोहीम राबवली गेली. त्यामध्ये 135 जणांच्या टेस्ट केल्या, त्यात 15 जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याची धक्कादायक बाब समोर आली.
सांगलीतील लॉकडाऊन 1 जूनपर्यंत वाढविला
जिल्ह्यात 26 पासून 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्येत होत असलेली वाढ लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील सात दिवस जिल्ह्यात लॉकडाऊनचे निर्बंध कडक असणार आहेत. भाजीपाला, किरकोळ किराणा, फळे, दूध, बेकरी माल घरपोच सेवा सुरू असेल. मात्र, इतर व्यवसाय पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहेत. जिल्ह्यात 144 कलम लागू राहील. नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चौधरी यांनी केले आहे.




























































