
आपली ट्रेन वेळेवर आहे का, की लेट येणार हे आता रेल्वे प्रवाशांना मोबाईलवर ‘पुश नोटिफिकेशन’वर अलर्टद्वारे ‘झटपट’ समजणार आहे. रेल्वेची तिकीट प्रणाली आणि खानपान सेवा सांभाळणाऱया आयआरसीटीसीने मे. मोमॅजिक टेलिजीस कंपनीबरोबर एक करार केला असून प्रवाशांना आता मोफत मोबाईलवर मोफत ‘पुश नोटिफिकेशन’द्वारे रेल्वेसंबंधित सर्व अलर्ट मिळणार आहेत. रेल्वेची तिकीट यंत्रणा व कॅटरिंग सेवा सांभाळणाऱ्या त्याचबरोबर प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य सेवेचा प्रसार करणारी उपकंपनी आयआरसीटीसीने आता प्रवाशांना आपल्या सेवांचे तातडीचे संदेश देण्यासाठी संगणकीय डाटा क्षेत्रातील मे. मोमॅजिक टेलिजीस कंपनीबरोबर करार केला आहे. या कंपनीद्वारे आयआरसीटीसी आपल्या ग्राहकांना आपल्या विविध सेवांची माहिती देणार आहे. त्यात नव्या गाडय़ांची घोषणा, कॅटरिंग सेवा, तसेच प्रवास, पर्यटन आणि हॉटेलिंग तसेच तिकिटांविषयीचे तातडीचे संदेश प्रवाशांना या कंपनीशी सबक्रिप्शन करताच संपूर्णपणे मोफत मोबाईलवर ‘पुश नोटिफिकेशन’द्वारे मिळतील असे जनसंपर्क अधिकारी आनंद कुमार झा यांनी सांगितले. आयआरसीटीसी या शिघ्र नोटिफिकेशन सेवेचा उपयोग प्रवाशांना विमान प्रवास, हॉटेल, कॅब बुकिंगची माहिती देण्याबरोबर ट्रेनच्या तिकिटांबरोबर अलीकडेच लाँच केलेल्या बसेसच्या बुकिंगची माहिती देण्यासाठीही करणार आहे.



























































