67 लाख रूपये किंमतीचे विदेशी मद्याचे 625 खोके ट्रकसह जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी  मद्याचे 625 खोके राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पकडले असून या मद्यासह ते वाहून नेणारा ट्रक असे एकूण 67 लाख 57 हजार रूपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला आहे. या प्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.

देशी-विदेशी मद्याची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्यांविरूद्ध  राज्य उत्पादन शुल्क विभागाने कठोर कारवाईचा बडगा उगारला असून राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या आदेशानुसार तसेच अंमलबजावणी व दक्षता संचालक श्रीमती उषा वर्मा, कोकण विभागाचे उपायुक्त सुनील चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली  मुंबईच्या महाराष्ट्र राज्य भरारी पथकाने ही कारवाई केली. या पथकाची या महिन्यातील अशा प्रकारची तिसरी मोठी कारवाई आहे.

सायन-पनवेल मार्गावर खारघर उड्डाण पुलाखालून अवैधरित्या विदेशी मद्याची वाहतूक होणार असल्याची खबर मिळताच मंगळवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पाळत ठेवून गोवा राज्यात निर्मिती व विक्रीसाठी असलेल्या हिंदुस्थानी बनावटीच्या विदेशी  मद्याचे 635 खोके असलेला ट्रक पकडला. महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाने कळवले आहे.

गेल्या सहा दिवसांपूर्वीच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने पनवेल येथे गोवा राज्यातील अवैध मद्याचे 56 लाख 50 हजार रुपये किंमतीचे 500 खोके तर 20 मे रोजी उस्मानाबाद येथेही 43 लाख 93 हजार रुपये किमतीचे अवैध मद्याच्या 575 खोक्यांसह मुद्देमाल जप्त केला आहे.