
लग्नाच्या वाढदिवशीच मानलेल्या भावाने चाकूने बहिणीवर आणि स्वतःवर वार केल्याची घटना मंगळवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास शिर्डीतील स्वामी विवेकानंद नगर रिंग रोड येथे घडली आहे. लग्नाच्या वाढदिवसाच्या तयारीत असलेल्या महिलेच्या गळ्यावर वार केल्यानंतर मानलेल्या भावाने स्वःतवर वार केले. यात महिलेसह तोही जखमी झाला आहे. महिलेच्या पतीने स्वतःचा आणि मुलांचा बचाव करत हल्लेखोराला दूर केले. त्यानंतर शेजाऱ्यांच्या मदतीने पत्नीला साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. रक्तस्त्राव मोठ्या प्रमाणात झाल्याने हल्लेखारोची प्रकृती चिंताजनक असून महिलेची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे यांनी दिलेल्या माहिती नुसार, विवेकानंदनगरमध्ये भाडोत्री घाटे नामक एक कुटूंब राहते. मंगळवारी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. घरी केक आणि इतर तयारी सुरु होती. दरम्यान पवन उर्फ गणेश परदेशी नामक व्यक्ती त्यांच्या घरी आला. पवन महिलेचा मानलेला भाऊ आहे. त्याने त्यांना केक कापू नका आणि फोटोही काढू नका, असे दरडावले. महिलेच्या पतीने फोटो काढून सोशल मिडीयावर टाकू तुला काय अडचण आहे असे विचारले. त्यावर पवनने विजय घाटे यांच्या पत्नीवर धारदार चाकूने वार करायला सुरूवात केली. विजय घाटे याने हल्लेखोराला दूर ढकलत आरडाओरडा केला. त्यामुळे पवनने त्याच हत्याराने स्वतःवर वार करत पळ काढला. विजय घाटे यांच्या हातात असलेल्या त्यांच्या बाळाला कोणतीही दुखापत झाली नाही. या हल्ल्यात त्यांची आणखी दोन मुले बचावली आहेत.
घाटे यांच्या मुलीने शेजारी राहणाऱ्या शबाना सय्यद यांना आवाज देत बोलावले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमी महिलेला उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये नेले. तसेच संबंधित घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरिक्षक प्रविण लोखंडे, सहायक पोलीस निरीक्षक दिपक गंधाले यांनी घटनास्थळी येत हल्लेखोर पवनला उपचारासाठी रुग्णालयात हलवले.
ही घटना नेमकी कोणत्या वादातून घडली किंवा घटनेमागील कारण काय याचा पोलीस तपास करत आहेत. विजय घाटे यांची आणि पवन उर्फ गणेश परदेशी यांची आधीपासून ओळख होती. घाटे कुटूंब पाणमळ्यात राहात होते. तेथेच पवनशी ओळख झाली. पवन त्यांच्या पत्नीचा मानलेला भाऊ होता. मुलांना तो खाऊ वैगेरे आणायचा. मुलेही त्याला मामा म्हणत होती अस विजय घाटे यांनी सांगितले. पोलिसांनी विजय घाटे यांच्या तक्रारीनुसार महिलेला जिवे ठार मारण्याचा आणि आत्महत्येचा प्रयत्न केल्याने पवनवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रविण लोखंडे करत आहेत.




























































