
चाळीस लाख लोकसंख्येच्या कोल्हापूर जिल्ह्यात सध्या 13 हजार 257 इतके सक्रिय रुग्ण असले तरी ही संख्या आशादायक नाही. त्यामुळे प्रशासनाच्या ‘झीरो पेंडन्सी’ धर्तीवर आता ‘झीरो रुग्ण’ ही संकल्पना घेऊन प्रशासन कार्यरत झाले आहे. यासाठी लढवय्या कोल्हापूरकरांनी या लढय़ात प्रशासनाला साथ द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.
राज्यात कोरोनाचा कहर सुरू झाल्यापासून अनेक प्रयत्नांतून 41 दिवसांनंतर थोडेसे सकारात्मक चित्र दिसून येत आहे. आता जिल्हा कोरोनामुक्त करण्यासाठी प्रशासकीय स्तरावरील ‘झीरो पेंडन्सी’प्रमाणे ‘झीरो रुग्ण’ मोहीम सुरू करण्यात आली आहे. आतापर्यंत लॉकडाऊनमध्ये जसा संयम बाळगला, तसेच यापुढेही प्रशासनाला सहकार्य करावे. जनतेच्या प्रतिसादाशिवाय हे शिवधनुष्य पेलणे शक्य नाही. सर्वांनी आपापली जबाबदारी ओळखून वागावे. मास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग याचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले.































































