
कोरोना लसीचे एक कोटी डोस पुरवण्यासाठी पालिकेने काढलेल्या ग्लोबल टेंडरला प्रतिसाद दिलेल्या आठपैकी फायझर कंपनीने टेंडर प्रक्रियेतून माघार घेतली आहे. माघार घेण्याचे कारण मात्र फायझरकडून देण्यात आले नसल्याचे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, टेंडरला प्रतिसाद दिलेल्या उर्वरित सात कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचेही प्रशासनाने सांगितले.
मुंबईत लसींच्या अपुऱ्या पुरवठय़ामुळे लसीकरण मोहिमेला वारंवार ब्रेक लागत आहे. त्यामुळे पालिकेच्या माध्यमातून सर्व मुंबईकरांचे वेगाने लसीकरण करण्यासाठी पुरवठय़ाचे ग्लोबल टेंडर काढण्यात आले. या टेंडरला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला. यामध्ये सहा कंपन्यांनी स्पुटनिक फाइव्ह तर एका पुरवठादाराने स्पुटनिक लाइट तर एका झेक कंपनीने अस्ट्राझेनका/फायझर लसीचा पुरवठा करण्यासाठी स्वारस्य दाखवले होते. मात्र आता अस्ट्राझेनका/फायझर कंपनीने टेंडर प्रक्रियेतून माघार घेत असल्याचा मेल पालिकेला केला आहे.
कागदपत्रे सादर करण्यासाठी 1 जूनची मुदत
- पालिकेने सर्व मुंबईकरांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ऑगस्टचे उद्दिष्ट ठेवून नियोजन केले आहे. यासाठी लसीकरण केंद्रे आणि कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचे नियोजन आहे. मात्र एक कोटी लसी उपलब्ध झाल्यानंतरच या मोहिमेला वेग मिळणार आहे.
- दरम्यान, स्वारस्य दाखवलेल्या सात कंपन्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्र सादर केले नसल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले. ग्लोबल टेंडरला याआधीच 1 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या कालावधीत कंपन्या आवश्यक कागदपत्रे सादर करतील आणि मुंबईला अपेक्षित डोस मिळतील, असा विश्वासही प्रशासनाने व्यक्त केला आहे.
































































