
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या शासन निर्णयावरून काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेवर मराठा समाजाने नाराजी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे आपल्या भूमिकेवर ठाम असताना आज काँग्रेस नेत्यांच्या विधान भवनातील बैठकीनंतर लोकशाहीच्या मार्गाने महाविकास आघाडी या मुद्दय़ावर चर्चा करेल आणि चर्चेअंती जो निर्णय घेतला जाईल तो मान्य असेल, अशी भूमिका नितीन राऊत यांनी स्पष्ट केली.
पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याचा निर्णय 7 मे रोजी राज्य सरकारने जारी केला. त्यानंतर काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी 7 मेचा शासन निर्णय रद्द करा, अशी भूमिका मांडली. आज मंत्रिमंडळ बैठकीआधी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीनंतर हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचे नितीन राऊत यांनी सांगितले होते. मात्र तौकते चक्रीवादळ तसेच कडक निर्बंधांबाबत असलेल्या निर्णयांमुळे यावर चर्चा होऊ शकली नाही.
मंगळवारी होणार उपसमितीची बैठक
मंत्रिमंडळ बैठकीत जरी या विषयावर चर्चा झाली नसली तरी मंगळवारी पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भातील उपसमितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार हेही उपस्थित राहणार असून या बैठकीत या विषयावर तोडगा निघण्याची शक्यता आहे.



























































