
राजुरा तालुक्यातील चुनाळ येथील रहिवासी असणाऱया गजानन भोपये या रुग्णाला कोरोनाची लागण झाली. ऑक्सिजन पातळी 48 वर आल्याने तब्येत एकदमच खालावल्याने ते घाबरून गेले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टर व सहकाऱयांनी त्यांना धीर देत वेळीच मदत केली. यामुळे 34 दिवसांच्या प्रदीर्घ उपचारानंतर कोरोनावर मात करून घरी परतल्याचे गजानन सांगतात.
बाहेरगावाहून आलेल्या गजानन भोपये यांना ताप व श्वास घेण्यास त्रास होत होता. यामुळे त्यांनी दवाखान्यात जाऊन तपासणी केली असता त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. दरम्यान, त्यांची ऑक्सिजन पातळीही खालावली होती. यामुळे गावचे सरपंच बाळनाथ वडस्कर यांच्या मदतीने ते उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाले.
राजुरा येथील उपजिल्हा रुग्णालयात 89-94 ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांनाच दाखल करण्यात येते. मात्र जिल्हा पातळीवर रुग्णांना दाखल करण्यासाठी जागेची कमतरता असल्याने या ठिकाणी 55-60 ऑक्सिजन पातळी असलेल्या रुग्णांना दाखल करून घेतले जाते. गजानन यांची ऑक्सिजन पातळी 48 असताना त्यांनादेखील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आल्याने ते काहीसे चिंतेत होते. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विवेक लांजेकर व त्यांच्या सहकाऱयांनी त्यांच्यावर यशस्वी उपचार करत त्यांना कोरोना संकटातून बाहेर काढले.
कोरोना रुग्णांना तातडीने उपचार मिळणे गरजेचे आहे. उपजिल्हा रुग्णालयात येणाऱया रुग्णांवर परिस्थितीनुसार आवश्यक औषधोपचार केले जातात. तसेच त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करून प्रतिकारशक्ती वाढविण्याचा प्रयत्न प्रामुख्याने केला जात असल्याचे डॉ. विवेक लांजेकर यांनी सांगितले.























































