वेब न्यूज – कोरोना आणि 5जी नेटवर्क

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्पायडरमॅन

कोरोनाचा विळखा जगभराला पडला आणि सोशल मीडियावर स्वयंघोषित तज्ञांची लाट उसळली. सगळ्या विषयातले सगळे ज्ञान फक्त आपल्यालाच आहे, अशा आवेशात मग हे तज्ञ कोरोना होण्याची, पसरण्याची विविध कारणे, त्यावरचे हमखास उपाय यावरती रकानेच्या रकाने भरून ज्ञान पाजळू लागले. यातले स्वतःला डॉक्टर, आयुर्वेदाचार्य समजणारे तज्ञ विविध काढे, मसाल्याचे पदार्थ अन् काय काय हमखास उपाय लोकांना सुचवू लागले.

आयुर्वेदिक काढय़ाच्या पाककृतींनी तर इतका कल्लोळ माजला की, लोक त्याला रामबाण उपाय समजून दिवसातून तीन तीन वेळा काढा पिऊ लागले. शेवटी काही दिवसात या काढय़ामुळे अनेकांना ‘मूळव्याधी’चा त्रास सुरू झाल्याच्या बातम्या झळकायला लागल्या, तेव्हा अनेकांचे डोळे उघडले. असेच काही यंत्र-तंत्रातले स्वयंघोषित तज्ञ अजूनही कोरोना कसा जन्मला किंवा तो कसा पसरतोय यावरती अत्यंत चुकीची माहिती पसरवण्यात हातभार लावतच असतात. अशाच काही तज्ञानी सध्या हिंदुस्थानात कोरोनाची दुसरी लाट ही ‘5जी तंत्रज्ञाना’मुळे आली असल्याचा जावईशोध लावला आहे.

फेसबुक, ट्विटरसारख्या माध्यमातून हा चुकीचा समज वेगाने पसरत आहे ही जास्ती काळजीची गोष्ट आहे. आता या सगळ्याची दखल घेऊन खुद्द दूरसंचार विभागाने यासंदर्भात खुलासा केला आहे. मोबाईल टॉवर अथवा ‘5जी’ तंत्रज्ञानाचे परीक्षण आणि कोरोना यांचा दूरदूरचाही काही संबध नसल्याचे दूरसंचार विभागाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे. हिंदुस्थानात तर अजून ‘5जी’ तंत्रज्ञानाची सुविधा चालूदेखील झालेली नाही, याकडे दूरसंचार विभागाने लक्ष वेधले आहे. लोकांनीदेखील अशा भ्रामक समजुतीवर विश्वास ठेवू नये, अशी विनंती करण्यात आली आहे. मोबाईल टॉवरद्वारे निघणारे रेडिओ तरंग हे अत्यंत कमी क्षमतेचे नॉन आयोनायजिंग तरंग असतात, आणि त्यापासून मनुष्यच नाही, तर इतर कुठल्याही सजीवाला धोका उद्भवण्याची शक्यता बिलकूल नसते, असेदेखील दूरसंचार विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. तरीही कोणा नागरिकाला एखाद्या टॉवरविषयी शंका असल्यास दूरसंचार विभागाच्या ‘https://tarangsanchar.gov.in/emfportal’ या पोर्टलवरती जाऊन संबंधित टॉवरच्या तपासणीसाठी विनंती नोंदवता येणार आहे.