बारावी सीबीएससीच्या परिक्षेचा निर्णय 1 जुनला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बारावीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षा घ्याव्यात की नाहीत, या दृष्टिकोनातून चर्चा सर्वांशीच केली होती. प्रत्येक राज्यामध्ये संबंधित सरकारशी ऑनलाइन पद्धतीने बोलणीही झालेली आहे. यामध्ये दोन पर्याय सूचविण्यात आले असून, महत्त्वाच्या विषयांसाठी तीन तासांऐवजी परीक्षा घ्यायची व प्रत्येक शाळेतील केंद्रामध्ये बसण्याची व्यवस्था घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आम्ही सर्व राज्यांची मते मागविली असून, बारावीच्या परीक्षेबाबत 1 जून रोजी निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय शिक्षण व दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली आहे.

नगर येथील शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, माजी नगराध्यक्ष अभय आगरकर, शहराध्यक्ष भय्या गंधे, उपाध्यक्ष सचिन पारखी, तुषार पोटे आदी यावेळी उपस्थित होते.

राज्यमंत्री धोत्रे म्हणाले, बारावीच्या सीबीएससी बोर्डाच्या परीक्षांबाबत केंद्र सरकारने सर्वांशी चर्चा केली होती. महत्त्वाच्या विषयांसाठी तीन तासांऐवजी परीक्षा घ्यायची व प्रत्येक शाळेतील केंद्रामध्ये बसण्याची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतलेला आहे. यासाठी आम्ही सर्व राज्यांची मते मागविली असून, या परीक्षेबाबत 1 जून रोजी निर्णय घेतला जाईल.

मराठा आरक्षणाचा विषय सर्व सामंजस्याने सोडविण्याची गरज

n राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा विषय सुरू आहे. सुप्रीम कोर्टाने सध्या याला स्थगिती दिलेली आहे. आता कोणता पक्ष सरकारमध्ये आहे, असा मुद्दा न करता सर्वांना बरोबर घेऊन हा विषय सोडवला पाहिजे. सर्वांनी सामंजस्याची भूमिका बजावली पाहिजे. आरोप-प्रत्यारोप करण्यापेक्षा यातून काय मार्ग निघेल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे, असे मतही राज्यमंत्री धोत्रे यांनी व्यक्त केले.

बीएसएनएलचे खासगीकरण नाही; बंदही होणार नाही

देशात माहिती-तंत्रज्ञानामध्ये मोठा बदल होत आहे. अनेक खासगी कंपन्या यामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे सरकारी कंपन्यांचा टिकाव लागला पाहिजे. बदलाच्या काळामध्ये बीएसएनएलमध्ये आम्ही स्वेच्छानिवृत्ती योजना आखली होती. कोरोनाचा काळ आल्यामुळे त्यामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या. भविष्यामध्ये बीएसएनएलचे जाळे मोठे करण्याच्या दृष्टिकोनातून विचार करणार आहोत. कोणत्याही परिस्थितीमध्ये बीएसएनएलचे खासगीकरण आम्ही करणार नाही तसेच ती संस्था बंद केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. आता 4जी सुविधाही बीएसएनएल सुरू करणार असून, त्याचे टेंडर निश्चित करण्यात आल्याचेही राज्यमंत्री धोत्रे यांनी सांगितले.