मराठेकालीन स्त्रीजीवन – झाशीच्या राणीचा घातक कंठा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ. अनुराधा कुलकर्णी

स्त्रीजीवनाचा अभ्यास करताना स्त्रियांच्या वेशभूषेचे, अलंकारांचे उल्लेख कागदपत्रांमधून मिळतात. स्त्रियांचा दागदागिने, कपडे यांचा सोस आदी काळापासून वर्तमानकाळापर्यंत कायम तिच्याबरोबरच आहे. सुंदर दिसण्यासाठी नटणे-सजणे, नीटनेटके राहणे हा स्त्रीचा मूलभूत स्वभावच आहे.

मराठेकालीन स्त्रीजीवनाचा अभ्यास, राजमाता जिजाबाईसाहेबांपासून सुरू होऊन झाशीची राणी लक्ष्मीबाईंपर्यंत येऊन पोहोचतो. या दोन्ही मराठी स्त्रियांनी, हिंदुस्थानी इतिहासावर आपल्या कर्तृत्वाची राजमुद्रा अंकित केली आहे.

स्त्रीजीवनाचा अभ्यास करताना स्त्रियांच्या वेशभूषेचे, अलंकारांचे उल्लेख कागदपत्रांमधून मिळतात. स्त्रियांचा दागदागिने, कपडे यांचा सोस आदी काळापासून वर्तमानकाळापर्यंत कायम तिच्याबरोबरच आहे. सुंदर दिसण्यासाठी नटणे-सजणे, नीटनेटके राहणे हा स्त्रीचा मूलभूत स्वभावच आहे.

मराठा साम्राज्याच्या राजमाता, जिजाऊसाहेबांनी नववधूच्या वेषात राजश्री शहाजीराजांच्या समवेत, भोसले घराण्याची सून म्हणून प्रवेश केला, त्यावेळी जिजाऊसाहेबांनी परिधान केलेल्या वेशभूषेचे व अलंकारांचे वैभवपूर्ण आणि दिमाखदार वर्णन कवी परमानंद यांनी शिवभारताच्या पोथीत केले आहे. परमानंद लिहितात, ‘विनयशील जिजाईने आपल्या पतीसह गृहप्रवेश केला तेव्हा तिच्या वेणीत बहुसुंदर प्रकारच्या अलंकारांची गर्दी झाली होती. मोती व रत्ने यांच्या माळांनी, रक्तवर्ण- तेजस्वी अशा डोकीतल्या फुलांनी, तिचा शिरोभाग सुशोभित झाला होता. तिच्या ललाट भागावर रत्ने लटकत असून तिच्या कानात सभोवती मोती ओवलेली अशी कुंडले झळकत होती. मोती व रत्ने यांचे मोठमोठे हार व गुच्छ तिच्या गळय़ात घातलेले होते. दंडात बाजूबंद असून हातात रत्नजडीत बांगडय़ा होत्या. पायाच्या बोटात मौल्यवान रत्नाभरणे, अंगावर चकाकणारी जरतारी वस्त्र धारण केली होती.’

मराठय़ांच्या राजदरबारात सरदार, शिलेदार, मानकरी यांना मानाचे कडे, शेला-पागोटे असे वस्त्र्ाालंकार देऊन प्रसंगानुरूप त्यांचा बहुमान केला जाई. या पुरुषांबरोबर त्यांच्या कुटुंबातील स्त्र्ायांचाही मानपान, पैठणी, लुगडी आणि दागिने देऊन केला जाई. बहुमातार्थ स्त्रियांना साडी-चोळीसाठी एखादे गाव इनाम मिळाल्याची उदाहरणेही मराठा इतिहासात आहेत.

स्त्र्ायांच्या वेशभूषेचे उल्लेख पैठणी, लुगडी, साडी, चोळी, चिरडी, छिटाचे कापड, मलमल, दुपट्टे, शेला असे येतात. लाल, कुसुंबी, हिरव्या रंगाच्या पैठण्यांची किंमत पाच रुपयांपासून पाचशे रुपयांपर्यंत असे. स्त्रिया प्रसंगी घोडय़ावरून प्रवास करीत. यावेळी त्यांचे पेहराव वेगळे असत. प्रवासात सुरवार वापरली जाई.

स्वस्वातंत्र्यासाठी, स्वहक्कासाठी कपटी इंग्रजांवर तोफा, बंदुका डागून स्त्रियांची कवायती फौज बाळगणाऱया झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या वस्त्र्ाालंकाराच्या अनेक गोष्टी त्यांचे चरित्रकार आणि त्यांना प्रत्यक्ष पाहणाऱया गोडसे भट व इंग्रजांनी लिहून ठेवलेल्या आहेत. लक्ष्मीबाईंच्या झाशी येथील संग्रहालयात राणीसाहेबांची अनेक चित्रे आहेत. नऊवारी लुगडे, पांढराशुभ्र पोशाख, घोडय़ावर बसताना सैनिकी पोशाख, पुरुषी पेहराव याबरोबरच जडावाचे ठळक अलंकार घातलेल्या लक्ष्मीबाईंच्या, सुसंस्कृत पेहरावावरूनही मराठेकालीन स्त्रियांच्या पेहरावाची कल्पना येऊ शकते. मराठेकालीन स्त्र्ायांची तत्कालीन पोथी चित्रेही आज उपलब्ध आहेत. या चित्रांमधूनही या स्त्रियांची वेशभूषा, अलंकार यांची ओळख आज आपल्याला होते.

मराठा काळातील स्त्रीजीवनाचा एक वैभवशाली पैलू म्हणजे मराठय़ांचे जवाहिरखाने- रत्नशाळा. रायगड, सातारा, कोल्हापूर, पुणे, नागपूर, बडोदा, इंदूर, ग्वाल्हेर अशा ठिकाणी मराठय़ांचे जवाहिरखाने होते. या जवाहिरखान्यांच्या जमाखर्ची कागदांमध्ये सोने-चांदीच्या, हिरे-माणिक, पाचू-मोती अशी बहुमोल रत्ने जडविलेल्या अलंकारांच्या नोंदी आहेत. स्त्र्ाया माथ्यापासून पायांच्या बोटांपर्यंत जे नानाविध दागिने वापरत या दागिन्यांच्या याद्या आपण आजही वाचू शकतो. या किमती, मौल्यवान अलंकारांचे मोल करणे आज फार अवघड काम आहे. यातील एका नोंदीतील एकाच अलंकाराचे उदाहरण सांगायचे तर…

इ. स. 1784-85 सालच्या पेशव्यांच्या रत्नशाळेच्या एका नोंदीनुसार, पुण्यलोक अहिल्याबाई होळकरांनी सवाई माधवराव पेशव्यांच्या लग्नात, वधू-वरांना आहेरादाखल अलंकार दिले होते. या आहेराच्या अलंकाराची यादी वाचताना पुण्यëलोक अहिल्याबाईंचे राजकारण देवधर्म, दानधर्म, प्रजाहितदक्षपणा, त्यांनी देवालये, घाट, धर्मशाळा, विहिरी अशी केलेली प्रचंड मोठी बांधकामे, अशा त्यांच्या अनेक गुणांबरोबरच जडजवाहिर-अलंकार यांची त्यांना असलेली उत्तम पारख आपल्यासमोर येते. या लग्न आहेरात पुण्यëलोक अहिल्याबाईंनी नववधू रमाबाईंना माथ्यावर घालण्याची एक बिंदी दिली होती. ही बिंदी जमाखर्ची यादीप्रमाणे तीन हजार आठशे रुपयांची होती. 1785 साली सोन्याचा भाव पंधरा रुपये दर तोळा होता. सोन्यात गुंफलेल्या आणि मोती, हिरे, माणके व पाचू लटकवलेल्या या बिंदीची किंमत काढणे आज अशक्य वाटते.

अशा मौल्यवान अलंकारांव्यतिरिक्त स्त्रियांचे दागिने ठेवण्याचे सोने-चांदीचे डबे, सोन्याची फ्रेम असलेले आरसे, सौंदर्य प्रसाधनांसाठी वापरात असलेले फणी-करंडे अशा वस्तूंच्या उल्लेखांबरोबरच स्त्रियांच्या दालनातील झुंबरांमधील, दिवे लावण्याच्या सोने-चांदीच्या दिवेलावणीची नोंद ही, वैभवशाली मराठा काळाचे वैभव तर दाखवतेच, पण त्या काळातील सुशोभित, सुसंस्कृत स्त्री नजरेसमोर उभी करते. या नोंदी राजघराण्यातील, सरदार, सावकारांच्या दफ्तरातील असल्या तरी हे अलंकार, वस्तू घडविणारे कारागीर, सोनार, सराफ महाराष्ट्रातच राहत होते. समाजातील सर्व स्त्र्ाया आपल्या ऐपतीप्रमाणे हे अलंकार, वस्तू विकत घेऊन वापरत असणारच.

स्त्र्ायांचा अलंकाराचा सोस किंवा आवड ही अनादी काळापासून आधुनिक काळापर्यंत सुरूच आहे. स्त्र्ायांची ही आवड धोकादायक ठरू शकते, हा अनुभवदेखील पूर्वापार व आजही आहेच. इंग्रजांना ‘मेरी झाशी नहीं दुंगी’ असे ठणकावून सांगणाऱया झाशीच्या राणीचे चरित्रकार द. बा. पारसनीसांनी राणी लक्ष्मीबाईंच्या चरित्रात एक उल्लेख केला आहे की,

‘झाशीच्या किल्ल्याच्या तटावरून पुत्र दामोदरसह, घोडय़ावरून उडी मारताना लक्ष्मीबाईंनी लढवय्या पुरुषाचा वेश धारण केला होता. तांबडय़ा रंगाचा कोट परिधान करून, डोईस सफेद फेटा बांधला होता. अत्यंत मौल्यवान अशा माणिक – मोत्यांचा कंठा राणीच्या गळय़ात होता. राणीच्या गळय़ातील पाणीदार मोत्यांच्या मौल्यवान कंठय़ाचा मोह इंग्रज पलटणीतील सैनिकांना होऊन त्यांनी राणीवर निकराचा मारा केला.’ आणि राणीचा हा मौल्यवान कंठा राणीला घातक ठरला.

(लेखिका इतिहास विषयाच्या अभ्यासक आहेत)
– [email protected]