
>> दिव्या नेरुरकर-सौदागर
‘अभ्यास’ हा एकच निकष विद्यार्थ्यांबाबतीत बहुतेक वेळा लावला जातो. पण अभ्यासाच्या जोडीला अंगभूत गुण ओळखून त्यांना वाव देणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक मूल हे स्वतःहून पुढे येईलच असं नाही. त्या वेळी त्याच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं मोठय़ांच्या हातात असतं. हे व्यासपीठ शक्यतो मुक्त असेल (चुकला तरी चालेल) तर प्रत्येक मूल हे नक्कीच त्या व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभे राहील. गरज आहे ती फक्त ‘त्याच्यावर विश्वास दाखवण्याची’ आणि ‘चुकलं तरी त्याला समजून घेण्याची.’
इयत्ता 7 वी ‘ई’! शाळेच्या अगदी कोपऱयात असलेला (शिक्षकांच्या आणि पालकांच्या दृष्टीने) वाया गेलेला एक वर्ग. शाळेतल्या जवळजवळ सगळय़ा शिक्षकांनी या वर्गापुढे हात टेकले होते. घरातल्या लोकांनी तर केव्हाच स्वतःच्या मुलांना सोडून दिलेलं होतं. ही मुलंही ‘हम नहीं सुधरेंगे’ हे वाक्य जणूकाही आपल्यासाठीच बनवलेलं असल्याप्रमाणेच शाळेत आणि त्यांच्या घरी वागत होती. दिलेला अभ्यास पूर्ण करणं, परीक्षेत पास होणं, शाळेत वेळेवर येणं हा जसा त्यांना अपमानच वाटत होता. ‘मस्ती’ त्यांच्या नसानसांत भिनली होती.
त्याच शाळेत मी समुपदेशनाचे काम करत होते. माझ्याकडे समुपदेशनासाठी जशी मुलं शाळेकडून पाठवली जात होती तसाच हा अख्खा वर्गच पाठवण्यात आलेला होता. शिक्षकांच्या बऱयाच तक्रारी आलेल्या होत्या. त्यांच्या मते ही 7वी ईची मुलं अभ्यासात तर ‘ढ’ होतीच शिवाय स्वभावाने निगरगट्टही होती.
मला आठवतंय, जेव्हा तो वर्ग बघण्यासाठी म्हणून मी गेले आणि त्या वर्गाचा दरवाजा उघडून पाहिला तेव्हा समोर दोन मुलांची मारामारी चाललेली होती. एकाने दुसऱयाला घट्ट पकडलेलं होतं आणि एकाला खाली पाडून दुसरा त्याच्यावर उभा राहण्याच्या प्रयत्नात होता. खाली पडलेला मुलगा कळवळत होता, रडत होता. ही मारामारी काही मुलं ‘एंजॉय’ करत होती. टाळ्या वाजवून, शिटय़ा मारून त्या दोघांना चेतवत होती. मारामारीत जो कोणी थांबेल त्याची टेर घेत हसत होती. वर्गातला मॉनिटर मस्ती करणाऱया आणि आरडाओरडा करणाऱया मुलांची नावं लिहीत होता. काही मुलं (फारतर 2-3 जण) स्वतःचा अभ्यास करत होती.
मी जशी त्या वर्गात शिरले तशी मारामारी थांबली आणि त्याबरोबर सगळ्या मुलांनी जणू काही घडलेलंच नाही या आविर्भावात मला ‘एक साथ नमस्ते’ केलं. ‘हे काय चाललं होतं?’ मी विचारलं. ‘टाईमपास’ कुठून तरी मागून आवाज आला. त्याबरोबर जोरात सगळा वर्ग हसायला लागला. मग मलाही हसायला आलं. मला हसताना बघून हळूहळू सगळा वर्ग शांत होत गेला. सगळी मुलं एकमेकांकडे बघायला लागली.
मी बहुतेक ‘लेक्चर’ द्यायला आले असं वाटून वर्गातील मॉनिटरने म्हटलंच, ‘‘ए ताई, यांना काही समजवू नकोस. हे काही सुधारणार नाहीत!’’ मी पुढे त्याला म्हटलं, ‘‘अरे, मी तुम्हाला काही समजवायला नव्हते आले. फक्त विचारायला आलेले… काय ते?’’ एव्हाना सगळा वर्ग टाचणी पडली तरी आवाज येईल इतका शांत झालेला होता. ‘मला फक्त एवढंच विचारायचं होतं की, तुम्ही शाळेच्या कुठल्याही स्पर्धेत भाग का घेत नाही?’ एवढं मी विचारायचा अवकाश तेवढय़ात एक मुलगा जोरात म्हणाला ‘‘हॅ! आम्ही ‘ई’ तुकडीत म्हणून आम्हाला कोणी निवडत नाहीत. आम्ही फुकट गेलेलो आहोत!’’ मग सगळ्यांनीच त्याची री ओढली. मग सगळी मुलं हळूहळू बोलती झाली.
जवळजवळ तासभर मी त्या वर्गात होते. त्यांच्या शिक्षकांबद्दल, त्यांच्या पालकांबद्दल आणि महत्त्वाचं म्हणजे शाळेतील इतर हुशार तुकडय़ांमध्ये असणाऱया मुलांबद्दल हा 7वी ई वर्ग भरभरून तक्रारी करत होता. हा वर्ग कमालीचा दुखावला गेला होता. कायम होत असलेली तुलना, फक्त त्यांच्यातल्या दोषांना होणारी शिक्षा आणि त्यामुळे जाणाऱया संधी या सगळ्याचे पर्यवसान त्यांच्या विध्वंसक वृत्तीत न होते तरच नवल.
त्यांच्या अशा वाया जाणाऱया ताकदीला एक दिशा हवी होती. आमच्या समुपदेशनात ‘गट समुपदेशन’ म्हणजेच ‘ग्रुप थेरपी’ हा प्रकार असतो, ज्यात एकाच वेळेस एका गटाला वेगवेगळय़ा पद्धतींनी समुपदेशन केले जाते. इयत्ता 7 वी ईसाठी याच पद्धतीचा अवलंब करावा लागला. त्यांच्यातल्या दोषांबरोबरच त्यांच्यात असलेले आणि मस्तीच्या आड लपलेले गुण इतरांना दाखवण्यापेक्षा या मुलांना स्वतःला दिसणं गरजेचं होतं.
मी शाळेत एका सामाजिक संस्थेमार्फत काम करत होते. त्यामुळे आमच्या संस्थेचे भरपूर उपक्रम शाळेत राबवण्यात येत होते. त्या सर्वच उपक्रमांत 7वी ईबरोबरच शाळेतल्या सगळ्याच ‘ड’ आणि ‘ई’ वर्गांची वर्णी लागली. निरनिराळ्या स्पर्धांचे आयोजन असो किंवा त्या कशा पार पाडायच्या याबद्दलच्या कल्पना असोत… ही सगळी मुलं हिरिरीने कामाला लागली. त्यांच्यासाठी मी बॅचेस केलेले होते जे त्यांच्या गणवेशावर सतत लावलेले होते. हे सगळं त्यांच्याकडून करवून घेताना एक वाक्य त्यांच्यावर सतत बिंबवलं जात होतं ‘आपण आता एक टीम आहोत.’
सगळ्या मुलांना या वाक्याचा अर्थ बहुतेक समजला होता. कारण अत्यंत जबाबदारीने आणि काळजीपूर्वक ही मुलं काम करत होती. एकमेकांच्या चुकांना सांभाळून घेत होती. प्रत्येक उपक्रम हा पहिला त्यांच्या कागदावर तयार होत होता. गरज असेल तर शिक्षकांच्या वेळा पाहून त्यांची मदत घेतली जात होती. त्या वर्षी त्यांनी आयोजित केलेली प्रत्येक स्पर्धा आणि इतर कार्यक्रम हे अख्ख्या शाळेला लक्षात राहिले होते. का नव्हते राहणार? शेवटी ‘ई’ तुकडीने बाजी मारली होती.
हा प्रसंग जरी 7-8 वर्षांपूर्वीचा असला तरी आता या लेखात मला लिहावासा वाटला. कारण आताही ‘अभ्यास’ हा एकच निकष विद्यार्थ्यांबाबतीत बहुतेक वेळा लावला जातो. पण अभ्यासाच्या जोडीला अंगभूत गुण ओळखून त्यांना वाव देणं हे तितकंच महत्त्वाचं असतं. प्रत्येक मूल हे स्वतःहून पुढे येईलच असं नाही. त्या वेळी त्याच्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून देणं मोठय़ांच्या हातात असतं. हे व्यासपीठ शक्यतो मुक्त असेल (चुकला तरी चालेल) तर प्रत्येक मूल हे नक्कीच त्या व्यासपीठावर आत्मविश्वासाने उभे राहील. गरज आहे ती फक्त ‘त्याच्यावर विश्वास दाखवण्याची’ आणि ‘चुकलं तरी त्याला समजून घेण्याची.’ शेवटी आपल्यालाच मुलांना त्यांनी नैराश्याने अथवा न्यूनगंडामुळे टोकाचे पाऊल उचलू नये म्हणून सावरायचे आहे, नाही का?
(लेखिका मानसोपचारतज्ञ व समुपदेशक आहेत.)
– [email protected]




























































