
श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण येथील गोदावरी नदीपात्रातून लिलाव पेक्षा जास्त वाळू उपसा सुरू आहे. हा लिलाव तातडीने बंद करून संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करावी.अशी मागणी करण्यात आली आहे.
ठेकेदाराने गोदावरी नदीपात्रात अनाधिकृतपणे जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर सहाय्याने दररोज सुमारे 300 डंपर वाळू उपसा करत आहे. हा अनाधिकृत वाळू उपसा श्रीरामपूर तहसिलदार, प्रांताधिकारी, सर्कल, तलाठी, पोलिस अधिकारी यांच्या आशीर्वादाने सुरू असल्याच्या तक्रारी गावकऱ्यांनी केल्या आहेत. परंतु त्याकडे दुर्लक्ष करून वाळु उपसा सुरू आहे. वाळू उपसामुळे शासनाला मिळणाऱ्या महसुलाचे मोठे नुकसान होत आहे. अधिकाऱ्यांशी संगनमत करून लिलावातील अटी व शर्ती चा भंग करून प्रमाणापेक्षा जादा वाळु उपसा केला आहे. अत्तापर्यंत किती वाळु उपसा केला यांच्याबाबतचा चुकीचा अहवाल तहसिलदार व प्रांताधिकारी यांच्या दबावाने सर्कल व तलाठी करत आहे.
अधिकाऱ्यांच्या सहकार्याने लॉकडाउन व जनता कर्फ्यू असताना देखील ठेकेदार अनाधिकृतपणे वाळु उपसा करत आहे. सदरचा बेकायदेशीर वाळू उपसा त्वरीत बंद करावा, किती वाळू उपसा झाला याचे मोजमाप भुजल सर्वेक्षण कार्यालय, भूमापन कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन करण्यात यावे, लिलावामध्ये नमुद केलेल्या परिमाणापेक्षा जास्त वाळू उपसा झाला असल्याने सदर ठेकेदाराचे डिपॉझिट जप्त करून दंडात्मक कार्यवाही करावी, शासनाच्या आर्थिक नुकसानीस जबाबदार असणाऱ्या अधिकारी यांच्यावर कडक कार्यवाही करावी. कोविडच्या महामारीमध्ये प्रशासन त्यांचे व्यवस्थापन करण्यामध्ये व्यस्त आहे.
लॉकडाउनमध्ये किंवा जनता कर्फ्युसारख्या उपाय योजनामुळे लहान-मोठे व्यापारी व हातावर पोट भरण्याचे व्यवसाय बंद आहेत. परंतु, अधिकाऱ्यांशी संगनमत करून वाळु माफियांचा बेकायदेशीरपणे वाळु उपसा करत आहे. सदरच्या नदीपत्रातील बेकायदेशीर वाळु उपसा त्वरीत बंद करून संबधीतांवर कडक कार्यवाही झाली पाहिजे.
विभागीय आयुक्तांकडे तक्रार
शिवसेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख राजेंद्र झावरे यांनी याबाबत विभागीय आयुक्तांकडे लेखी तक्रार केली आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ व जिल्हाधिकारी यांनी बेकायदा वाळू उपसा करणाऱ्या ठेकेदार तसेच अधिकार्यावर कडक कारवाई करावी. अशी मागणी त्यांनी केली आहे.



























































