
इंग्लंडमधील चेल्सी क्लबने आपल्याच देशातील मँचेस्टर सिटी क्लबचा अंतिम लढतीत 1-0 गोल फरकाने पराभव करून चॅम्पियन्स लीगच्या झळाळत्या करंडकावर आपले नाव कोरले. चेल्सीने तब्बल 9 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर या स्पर्धेच्या किताबाला गवसणी घातली. कोरोनाच्या संकटातही तब्बल 14 हजार फुटबॉलशौकीनांच्या साक्षीने ही जेतेपदाची लढत मोठय़ा जल्लोषी वातावरणात पार पडली, हे विशेष.
42व्या मिनिटाला झाला एकमेव गोल
केई हॅवर्ट्झ याने 42व्या मिनिटाला लढतीतील एकमेव गोल केला. त्याच्या गोल्डन गोलच्या जोरावर चेल्सीने चॅम्पियन्स लीग स्पर्धेतील जेतेपदाचा दुष्काळ संपवला. चेल्सीने याआधी 2012मध्ये ही स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. प्रशिक्षक पेप गाडिऱयोला यांच्या मार्गदर्शनाखाली मँचेस्टर सिटी क्लबला या वेळी जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानले जात हेते. ही जेतेपदाची लढत तुर्कीतील इस्तांबूल येथे होणार होती. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही लढत पोर्तुगालच्या पोर्टो या शहरात स्थलांतरित करण्यात झाली.
सहा आठवडय़ांत तिसऱयांदा पराभव
चेल्सीने मागील सहा आठवडय़ांत मँचेस्टर सिटीला तिसऱयांदा हरवले. मॅनेजर थॉमस तुशेल यांच्या मार्गदर्शनाखाली चेल्सीने लीग कप आणि एफए कपमध्ये मँचेस्टर सिटीचा पराभव केला होता. मागील हंगामात पॅरिस सेंट जर्मेनकडून चेल्सीचा संघ अंतिम फेरीत पराभूत झाला होता. मँचेस्टर सिटीने नुकतेच प्रीमियर लीग चॅम्पियनशिपवर नाव कोरले आहे. या विजेतेपदासह चेल्सी हा दोनदा चॅम्पियन्स लीग विजेतेपद जिंकणारा इंग्लंडचा तिसरा संघ ठरला. याआधी लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेडने दोन वेळा चॅम्पियन्स लीगचे विजेतेपद जिंकलेले आहे.



























































