
कोरोनाच्या वाढता प्रादुर्भाव आणि रेड झोन मध्ये पोहचलेला रत्नागिरी जिल्हा याकडे गांभीर्याने लक्ष देत रत्नागिरी जिल्ह्यात 2 ते 8 जून कालावधीत कडक लॉकडाऊन जाहिर करण्यात आले आहे. याकालावधीत जिल्हाबंदी असणार आहे तसेच किराणा आणि दूध विक्रीसाठी फक्त घरपोच सेवा देता येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी जाहिर केला आहे.
2 जून रोजी सकाळी सात वाजल्यापासून ते 8 जून रोजी सकाळी सात वाजे पर्यंत कडक लॉकडाऊन ज़ाहिर करण्यात आले आहे. याकालावधीत मेडीकल दुकाने, आरोग्य विषयक आस्थापना पूर्णवेळ सुरू राहातील. त्या व्यतिरिक्त अन्य सर्व आस्थापना बंद रहातील. दूध आणि किराणा मालाच्या दुकानांना सकाळी 7 ते 11 वा.दरम्यान घरपोच सेवा देता येणार आहे. शेतीचा हंगाम असल्याने कृषीविषय दुकाने सकाळी 7 ते 2 वा. दरम्यान सुरू रहातील.याकालावधीत जिल्हयाच्या सीमा बंद करण्यात येणार आहेत.केवळ वैद्यकीय उपचार, नातेवाईकाचे अंत्यविधी, कोविड 19 व्यवस्थापन किंवा निकडीची आणीबाणीच्या प्रसंगी जिल्ह्यात येण्यासाठी किंवा जिल्ह्याबाहेर जाण्यासाठी मुभा देण्यात येणार आहे. तसेच मालवाहतुकीवर कोणतेही निर्बंध रहाणार नाहीत असा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे.




























































