
दक्षिण अमेरिकेची फुटबॉल संस्था असलेल्या कॉनमेबोलने कोपा अमेरिका स्पर्धेच्या आयोजनाचा तिढा अखेर सोडविला. अर्जेंटिनामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्याने आत ही स्पर्धा ब्राझीलमध्ये स्थलांतरित करण्यात आली आहे. कॉनमेबोलने ही घोषणा केली.
बाझीलमध्ये 13 जून ते 10 जुलै दरम्यान ही स्पर्धा रंगणार आहे. यजमान ब्राझील व वेनेजुएला यांच्यातील लढतीने माने गरिंचा स्टेडियमवर या स्पर्धेचे उद्घाटन होईल, तर रियो डी जेनेरियो येथील ऐतिहासिक मरकाना स्टेडियमवर 10 जुलैला स्पर्धेचा अंतिम सामना रंगेल. मरकाना स्टेडियमवर फक्त फायनलची लढत रंगणार आहे. या स्टेडियमवर याआधी दोन वर्षांपूर्वी ब्राझीलने पेरूचा 3-1 गोल फरकाने पराभव करून या स्पर्धेत नववा किताब जिंकला होता. कोपा अमेरिका स्पर्धेची यजमानी अर्जेंटिना व कोलंबिया या दोन देशांत होणार होती. मात्र अर्जेंटिनामध्ये कोरोनाचा प्रकोप वाढल्याने त्यांचे यजमान पद काढून घ्यावे लागले. त्याआधी कोलंबिकाचे राष्ट्रपती इवान डय़ूक यांच्याविरुद्ध प्रदर्शन सुरू असल्याने त्या देशालाही कोपा अमेरिका स्पर्धेची यजमानी गमवावी लागली.
या स्पर्धेत 10 संघांची दोन गटांत विभागणी करण्यात आली आहे. ‘अ’ गटात अर्जेंटिना, बोलिबिया, उरुग्वे, चिली व पराग्वे हे संघ आहेत, तर ‘ब’ गटात ब्राझील, कोलंबिया, वेनेजुएला, इक्वेडर व पेरू हे संघ आहेत. प्रत्येक गटातून चार अक्वल संघ उपांत्यपूर्व फेरीत जातील व त्यानंतर बाद फेरीचा थरार सुरू होईल.


























































