
उत्पन्नापेक्षा 30 लाख 56 हजार 426 रुपयांची बेहिशेबी मालमत्ता (48.71 टक्के) आढळल्याने निवृत्त पोलीस उपनिरीक्षक जनार्दन दगडू जाधव, पत्नी जयश्री व मुलगा प्रसाद (सर्व रा. प्लॉट नं. 31, गुरुकृपा बंगला, रमणमळा, कोल्हापूर) या तिघांवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून आज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी फिर्याद दिली आहे.
निवृत्त होण्यापूर्वी जनार्दन जाधव हे आजरा पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. दि. 31 ऑक्टोबर 2001 ते 25 एप्रिल 2017 या परीक्षण कालावधीत 30 लाख 56 हजार 426 एवढी उत्पन्न स्रोतांपेक्षा अधिक अशी 48.71 टक्के बेहिशेबी मालमत्ता चौकशीत आढळून आली. कुटुंबीयांनी संशयित आरोपीस साहाय्य केल्याने त्यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत हे चौकशी अधिकारी असून, पोलीस निरीक्षक युवराज सरनोबत तपास अधिकारी आहेत.
दरम्यान, पोलीस आणि अवैध व्यावसायिकांमध्ये ‘जे.डी.’ म्हणून परिचित असलेले जनार्दन जाधव यांना पाठिशी घालणाऱ्य़ावर कारवाई होणार काय, याकडे पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.



























































