पश्चिम बंगालमध्ये भाजपला खिंडार, 33 आमदार तृणमूल मध्ये सामील होणार?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम बंगालमध्ये निवडणूकीपूर्वी तृणमूल काँग्रेसचे अनेक भाजपामध्ये सामील झाले होते. आता भाजपमधील अनेक आमदारांनी तृणमूलमध्ये जाण्याची तयारी दर्शवली आहे. भाजपचे एकूण 33 आमदार तृणमूलमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच पूर्वाश्रमीचे तृणमूलचे आणि आता भाजप  मुकुल रॉय यांच्याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. मुकुल रॉयही घरवापसी करण्याची चिन्हे आहेत.

द क्विंट या वेबसाईटने याबाबतही वृत्त दिले आहे. मुकुल रॉय यांच्या पत्नी रुग्णालयात दाखल होत्या. तेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे भाचे अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांची भेट घेतली होती. तेव्हापासून मुकुल रॉय हे तृणमूलमध्ये परततील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

33 आमदरांची घरवापसी ?

33 आमदार भाजप सोडून तृणमूलमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. 2 मे नंतर विधानसभेचा निकाल लागल्यानंतर अनेक आमदारांनी तृणमूलमध्ये परतण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यात आमदार सोनाली गुहा आणि सरला मुर्मू यांच्या नावाचा समावेश आहे.

सरला मुर्मू यांनी आपली चूक झाल्याचे म्हटले होते. तसेच ममता बॅनर्जी यांची माफी मागत मुर्मू म्हणाल्या की मला आशा आहे की ममता बॅनर्जी मला माफ करतील आणि मला स्विकारतील. जर त्यांनी मला स्विकारले तर मी पूर्ण इमानदारीने त्यांच्या पक्षासाठी काम करेन असे मुर्मू म्हणाल्या. विधानसभच्या माजी सभापती सोनाली गुहा यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पत्र पाठवून माफी मागितली होती. भाजपमध्ये आपला श्वास कोंडत असून भाजपशी आपले सर्व संबंध आपण तोडत असल्याचे त्यांनी सांगितले होते. जेव्हा मला ममता बॅनर्जी मला बोलवतील तेव्हा मी तृणमूलमध्ये सामील होईल असेही गुहा म्हणाल्या होत्या.

असे असले तरी भाजप प्रवक्ते शमिक भट्टाचार्य यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. ही अफवा असल्याचे सांगत हे नेते रडत रडत भाजपमध्ये सामील झाल्याचे त्यांनी म्हटले.