सावधान! लसीकरणाचे मेसेज काळजीपूर्वक वाचा, नाहीतर होऊ शकतं नुकसान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशात कोरोनाचा विळखा कमी करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. पण, याचसोबत लसीकरणाच्या नावाखाली सायबर गुन्ह्यातही वाढहोताना दिसत आहे.

काही सायबर तज्ज्ञांना एका नवीन अँड्रॉईड वायरसचा शोध लागला असून तो एसएमएसद्वारे लोकांचं बँक अकाउंट रिकामं करू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.

सायबर चोरांनी एक नवीन मालवेअर विकसित केला असून तो लोकांना एसएमएसद्वारे पोहोचवला जातो. त्या मेसेजमध्ये एक लिंक असते. ही लिंक क्लिक केल्याने तुमचं कोविड लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन होईल, असा मजकूर लिंकसोबत दिला जातो. लिंकवर क्लिक केल्याने तो मालवेअर फोनमध्ये शिरतो आणि फोनचे कॉन्टॅक्ट, मेसेजसह अन्य काही अॅप्लिकेशनचे अॅक्सेस मागतो.

तो अॅक्सेस मिळाला की, सायबर चोर तुमच्या फोनमधील बँक अॅप्लिकेशन किंवा तत्सम आर्थिक व्यवहारांसाठीच्या अॅप्लिकेशन्सना प्रभावित करून तुमचं अकाउंटमधून तो पैसे काढू शकतो. या मालवेअरला Covid-19 vaccine, Covid-19 vaccine registration, Vaccine Register, My-Vaci अशी नावं देण्यात आली आहेत.

कसं वाचाल यापासून

अशा कोणत्याही वायरसपासून वाचण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे अशा कोणत्याही एसएमएसच्या लिंकवर क्लिक करू नका. नेहमी आरोग्य सेतू किंवा कोविन या सरकारी अॅप्लिकेशनवरूनच नोंदणी करा. कधीही कोणी फॉर्वर्ड केलेले एसएमएस उघडू नका. किंवा कोणालाही आपली खासगी माहिती शेअर करू नका.