पालिकेच्या पाच रुग्णालयांत आठवडाभरात प्राणवायूची निर्मिती!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या पाच रुग्णालयांत आठवडाभरातच प्राणवायू ऑक्सिजनची निर्मिती सुरू होणार आहे. यामध्ये चिंचपोकळीचे कस्तुरबा, घाटकोपरचे राजावाडी, विलेपार्ल्याचे कूपर, बोरिवलीचे भगवती आणि वांद्रय़ाच्या भाभा रुग्णालयात ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज या ऑक्सिजननिर्मिती प्रकल्पांचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी प्रकल्पांची माहिती दिली.

कोरोनाच्या दुसऱया लाटेत कोरोना विषाणूच्या बदललेल्या स्ट्रेनमुळे बाधित रुग्णांकडून ऑक्सिजनची मागणी वाढली. देशभरात ऑक्सिजन पुरवठय़ाची आणीबाणी निर्माण झाली, मात्र पालिकेच्या नियोजनामुळे मुंबईत ऑक्सिजनअभावी एकही रुग्ण दगावला नाही. यातच तिसऱया लाटेचा धोका असल्याने रुग्णसंख्या वाढल्यास गैरसोय होऊ नये यासाठी पालिकेने आपली संपूर्ण यंत्रणा तैनात ठेवताना बारा ठिकाणी सोळा ऑक्सिजन निर्मिती प्लांट सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आठवडाभरात पाच ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती सुरू होणार आहे.

अशी होणार ऑक्सिजन निर्मिती
n कस्तुरबा रुग्णालय ः प्रतिमिनिट 200 लिटर
n राजावाडी रुग्णालय ः प्रतिमिनिट 1 हजार लिटर
n कूपर रुग्णालय ः प्रतिमिनिट 850 लिटर
n भगवती रुग्णालय ः प्रतिमिनिट 850 लिटर
n वांद्रे भाभा रुग्णालय ः प्रतिमिनिट 650 लिटर