पोलीस असल्याचे सांगून आणि ट्रकचालकाला मारहाण करून भंगाराचे साहित्य लुटणाऱया पाचजणांच्या टोळीला श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे. हे पाचही कुख्यात आरोपी मोक्काअंतर्गत कारवाई झालेले असून, सध्या जामिनावर बाहेर आलेले आहेत.
तोफिक सत्तर शेख (वय 35, रा. काजीबाबा रोड, श्रीरामपूर), साजिद खालीद मलीक उर्फ मुनचुन (वय 24, रा. पापाजलाल रोड, श्रीरामपूर), जावेद मुक्तार कुरेशी (वय 24, रा. बजरंग चौक, श्रीरामपूर), श्याम भाऊराव साळुंके (वय 20, रा. खटकळी, बेलापूर, ता. श्रीरामपूर), आरबाज जाकीर मन्सुरी उर्फ पिंजारी (वय 19, रा. कुरेशी मोहल्ला, श्रीरामपूर), युसूफ उर्फ सोनू आजम शेख (रा. लक्ष्मीनगर, कोपरगाव), शोएब फकिरा कुरेशी उर्फ वैजापूरवाले (रा. श्रीरामपूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. आरोपी तोफिक शेख याच्यावर 15 गुन्हे दाखल आहेत, तर साजिद मलिक याच्यावर सहा गुन्हे विविध पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असल्याचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांनी सांगितले. याप्रकरणी श्रीधर जंगलू सोनवणे (वय 34, रा. लजपतराय वाडी, एकलहरे, ता. श्रीरामपूर) यांनी फिर्याद दिली होती.
श्रीधर सोनवणे हे 27 मे 2021 रोजी ट्रकमध्ये भंगारचे साहित्य घेऊन नगरकडे निघाले होते. त्यावेळी शनिशिंगणापूर फाटय़ाजवळ इंडिका कारमधून आलेल्या पाचजणांनी त्यांना पोलीस असल्याचे सांगून मारहाण केली आणि त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना वरवंडी शिवारात सोडले होते. आरोपींनी जवळपास 5 लाखांचा माल लुटला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
या गुह्याचा तपास सुरू असताना मोक्कातून जामिनावर सुटलेल्या तोफिक शेख आणि त्याच्या साथीदारांनी हा गुन्हा केल्याची माहिती पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना मिळाली. त्यानंतर पोलीस पथकाने श्रीरामपूर येथे सापळा रचून आरोपींना अटक केली.
स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, गणेश इंगळे, मनोज गोसावी, सुरेश माळी, विशाल दळवी, दीपक शिंदे, शंकर चौधरी, सागर ससाणे, आकाश काळे, जालिंदर माने, उमाकांत गावडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.




























































