जैतापूरमध्ये आढळली नवी फुलवनस्पती, न्यूझीलंडच्या फायटोटॅक्सा नियतकालिकाने घेतली दखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जैतापूरमधील साखर, कोंबे, करेल परिसरातील कातळावरील डबक्यात फुलणाऱया फुलवनस्पतीच्या संशोधनावर शिक्कामोर्तब झाले आहे. ‘जैतापूरेंनसींस चांदोरे व एस.आर. यादव’ असे या वनस्पतीचे नामकरण केले आहे. जैतापूर गावाच्या नावावरून वनस्पतीला नाव दिले आहे. विशेष म्हणजे या नव्या फुलवनस्पतीचे संशोधन न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱया फायटोटॅक्सा या जागतिक स्तरीय नियतकालिकामधून गेल्या आठवडय़ात प्रकाशित झाले आहे.

कोकणातील कातळावरील वनस्पतीचा अभ्यास करताना 2015मध्ये ही फुलवनस्पती प्रथम संशोधकांच्या निदर्शनास आली. सुमारे पाच वर्षांच्या संशोधनानंतर या फुलवनस्पतीचा कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठातील वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा.डॉ. एस.आर. यादव, राजापूरच्या आबासाहेब मराठे महाविद्यालयातील प्रा. डॉ. अरुण चांदोरे, त्यांचे संशोधक विद्यार्थी देवीदास बोरुडे, दक्षिण कोरियाच्या जीवरसायनशास्त्र विभागाचे डॉ. असीफ तांबोळी, प्रा.डॉ. संजय गोविंदराव, नाशिक येथील व्ही.एन. नाईक महाविद्यालयाचे अविनाश घोलवे आदींनी या फुलवनस्पतीचा शोध लावला.

फुलवनस्पतीची वैशिष्टय़े

n या वनस्पतीचा संशोधकांनी अभ्यास केला असता ती जांभळी मंजिरीच्या म्हणजेच पोगोस्टेमॉन डेक्कनेसींसच्या जवळची असल्याचे लक्षात आले.
n या वनस्पतीची फुले गुलाबी रंगाची आणि बारीक असून त्यांची लांबी 5 मि.मी. आहे. पुंकेसर 4 व गुलाबी रंगाचे आणि 4 ते 5 मि. मी. लांब असतात.
n नोव्हेंबर महिन्यापासून फुलांना तुरा येण्यास सुरुवात होते. फुले आणि फळांचा कालावधी नोव्हेंबर ते फेबुवारी असा आहे. जैतापूरच्या 5 कि.मी. परिसरात आढळणाऱया या वनस्पतीची लांबी 3 फुटापर्यंत पसरते.