टी-20 वर्ल्ड कप यूएई, ओमानला होण्याचे संकेत ; कोरोनामुळे हिंदुस्थान आयोजनापासून दूर राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेमुळे हिंदुस्थान टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाला मुकणार हे जवळपास निश्चित झाले आहे. आता ही प्रतिष्ठेची स्पर्धा यूएई व ओमानला हलवण्यात येणार आहे. आयसीसीने बीसीसीआयला टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी 28 जूनपर्यंतची मुदत दिली आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने स्पर्धेची तयारी सुरू करण्याची सूचना आयसीसीला दिली आहे.

स्पर्धेचे अधिकार मात्र बीसीसीआयकडेच

आयसीसीच्या बैठकी दरम्यान बीसीसीआयने चार आठवडय़ांची मुदत मागितली होती. याचसोबत टी-20 वर्ल्ड कप इतर ठिकाणी हलवण्याचेही त्यांच्याकडून सांगण्यात आले होते. यूएई व ओमान या दोन ठिकाणी स्पर्धा हलवल्यास बीसीसीआयचा विरोध असणार नाही. पण स्पर्धेचे संपूर्ण अधिकार बीसीसीआयकडेच असायला हवेत, असेही बीसीसीआयकडून आयसीसीला स्पष्टपणे सांगण्यात आले आहे.

चार स्टेडियम्समध्ये लढती होण्याची शक्यता

टी-20 वर्ल्ड कपच्या लढती यूएईतील तीन आणि ओमानमधील एका स्टेडियममध्ये होण्याची शक्यता आहे. यूएईतील अबुधाबी, दुबई व शारजाह या तीन स्टेडियम्ससह ओमानची राजधानी मस्कट येथील स्टेडियमवर टी-20 वर्ल्ड कपच्या लढती खेळवण्याचा विचार सुरू आहे.

सुरुवातीच्या लढती ओमानमध्ये खेळवणार

आयपीएलचा मोसम 10 ऑक्टोबरला संपण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत टी-20 वर्ल्ड कपमधील यूएईतील लढती नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. टी-20 वर्ल्ड कपमधील प्राथमिक फेरीच्या लढती ओमानमध्ये आयोजित करण्यात येतील. यामुळे यूएईतील स्टेडियम्समधील खेळपट्टय़ांना पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी तीन आठवडय़ांचा कालावधी मिळेल. यूएईतील तीन स्टेडियम्समध्ये 10  ऑक्टोबरपर्यंत लढती खेळवण्यात येणार आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपच्या लढतींचे आयोजन करण्याआधी खेळपट्टय़ा ताजातवान्या राहण्याची गरज आहे. यासाठी ओमानला सुरुवातीच्या लढतींसाठी पसंती देण्यात येणार आहे.

…म्हणून स्पर्धा इतरत्र हलवणार

बीसीसीआय या महिन्यात टी-20 वर्ल्ड कपच्या आयोजनाबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. पण ऑक्टोबर महिन्यात हिंदुस्थानात कोरोनाची परिस्थिती कशी असेल हे जून महिन्यात सांगता येणार नाही. तसेच कोरोनामुळे आयपीएल अर्ध्यावरच सोडावे लागले आहे. शिवाय आयपीएलचा उर्वरीत मोसमही यूएईला हलवण्यात आला आहे. टी-20 वर्ल्ड कप आयोजनादरम्यान कोरोनाची लाट आल्यास स्पर्धेवरही संकट कोसळेल.  आठ संघांचा सहभाग असलेल्या आयपीएलचे आयोजन करण्यास बीसीसीआय घाबरतेय तर मग 16 संघाचा सहभाग असलेल्या टी-20 वर्ल्ड कपचे आयोजन बीसीसीआय स्वतःच्या देशात कसेकाय करू शकते, असा सवालही बीसीसीआयच्या सूत्रांकडून या वेळी करण्यात आला आहे. याचा अर्थ कोरोनामुळे टी-20 वर्ल्ड कप इतरत्र हलणार हे निश्चित आहे.