
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून हा राज्याभिषेक दिन आज राज्यभरात ‘शिवस्वराज्य दिन’ म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालये तसेच अन्य सरकारी कार्यालयांत त्याचप्रमाणे महाविद्यापीठे व महाविद्यालयांमध्ये शिवस्वराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर आधारित विविध प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून हा दिवस साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा 6 जून 1674 रोजी राज्याभिषेक झाला. शिवराज्याभिषेक हा स्वराज्याची, स्वातंत्र्याची, सार्वभौमत्वाची प्रेरणा देणारा दिवस म्हणून मानला जातो. हा दिवस शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार आज ग्रामपंचायती, पंचायत समित्या, जिल्हा परिषदा तसेच अन्य प्रशासकीय कार्यालयांत हा दिन मोठय़ा उत्साहात पार पडला. नगरच्या जिल्हा परिषदेत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढी उभारली. तर लातूर येथे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोड यांनी शिवशक राजदंड स्वराज्यगुढीचे पूजन केले. ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात पारंपरिक शिवकालीन तुतारीच्या निनादात शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.
शासकीय अभियांत्रिकी कॉलेजात रविवारी प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करून शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱहे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शिवशक राजदंड स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवरायांना मानवंदना दिली.
महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला क्षण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शिवरायांना अभिवादन
युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला आहे. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यानिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या. शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्री म्हणतात, ‘स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांनी राज्याभिषेकातून रयतेचे आत्मभान जागे केले. जनतेच्या मनातील आणि लोककल्याणकारी राज्य प्रत्यक्षात आणले. रयत आणि मातृभूमी यांच्या हिताला सर्वेच्च प्राधान्य दिले. प्रजाहितदक्ष, मुत्सद्दी, धुरंधर शिवरायांच्या पराक्रमाचे तेज आजही आपण अनुभवतो. शिवराज्याभिषेक हा महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला सुवर्ण क्षण आहे. या दिनानिमित्त सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा आणि छत्रपती शिवाजी महाराज यांना त्रिवार मानाचा मुजरा.’



























































