राहुरीत उसाच्या शेतात मृत बिबटय़ा आढळला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राहुरी तालुक्यातील कोंढवड शिवारातील उसाच्या शेतात आज सकाळी नर जातीचा बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला आहे. गेल्या चार महिन्यांच्या कालावधीत राहुरी तालुक्यात बिबट मृत्यूची ही तिसरी घटना आहे.

कोंढवड येथील दत्तात्रय म्हसे यांच्या उसाच्या शेतात पाणी भरण्याचे काम सुरू असताना मृत बिबटय़ा आढळून आला. या घटनेची माहिती वन विभागाला मिळताच, वन कर्मचारी गोरक्षनाथ मोरे हे घटनास्थळी दाखल झाले. मृत बिबटय़ाचा पंचनामा करून अंत्यसंस्कारासाठी मृतदेह राहुरीच्या डिग्रस नर्सरीत हलविण्यात आला. यावेळी कोंढवड येथील शेतकरी भागवत म्हसे, शिवाजी औटी, श्रीकांत म्हसे, रंगनाथ म्हसे, बबलू औटी, पंडित हिवाळे, अशोक म्हसे, गोरक्षनाथ म्हसे, भाऊ औटी, योगेश हिवाळे, गणेश हिवाळे, क्षितिज हिवाळे, दत्तात्रय हिवाळे आदींनी वन विभागाच्या कर्मचाऱयांना मदत केली.

मुळा, प्रवरा पट्टय़ात बिबटय़ांची संख्या वाढली

राहुरी हा बागायत पट्टा म्हणून ओळखला जातो. उसाचे क्षेत्र मोठय़ा प्रमाणात असल्याने बिबटय़ाला निवाऱयाची सुरक्षित सोय उपलब्ध होत आहे. तसेच, पाणी व भक्ष्य सहजपणे मिळत असल्याने मुळा व प्रवरा नद्यांच्या पट्टय़ात बिबटय़ांची संख्या वाढली आहे. राहुरी तालुक्यातील ग्रामीण भागात शेतकऱयांना बिबटय़ाचे दर्शन घडल्याच्या घटना कायमच सुरू आहेत. ज्या भागात बिबटय़ाचा वावर आहे, तेथील शेतकऱयांच्या शेतीकामावर मर्यादा आल्या आहेत.

चार महिन्यांत राहुरीमधील तिसरी घटना

11 फेब्रुवारी ते 7 जून या कालावधीत राहुरी तालुक्यात तीन बिबटय़ांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 8 मार्चला तालुक्यातील कात्रड येथे घुगरकर यांच्या विहिरीत पडलेल्या बिबट मादीला शेतकऱयांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना या मादीचा मृत्यू झाला. दुसरी घटना 15 मार्चला घडली. नगर-मनमाड राज्य महामार्गावर रस्ता ओलांडत असताना अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट मादी जागीच ठार झाली. तर आज कोंढवड येथे उसाच्या शेतात बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला आहे.