कामगारांवर अन्याय कराल तर गाठ समितीशी, एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीचा व्यवस्थापनाला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेना नेहमीच मराठी माणसाच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. एअर इंडिया आणि एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेसमधील कर्मचारी, कामगारांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. पण व्यवस्थापनाने कामगारांवर अन्याय करण्याचा प्रयत्न केला, त्यांना जाणूनबुजून त्रास देण्याचा प्रयत्न केला तर समितीशी गाठ आहे, असा इशारा एअर इंडिया स्थानीय समितीचे अध्यक्ष आमदार विलास पोतनीस यांनी दिला आहे.

स्थानीय लोकाधिकार समिती महासंघाचे अध्यक्ष गजानन कीर्तिकर, महासंघाचे सरचिटणीस-शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई, महासंघाचे कार्याध्यक्ष आनंदराव अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली एअर इंडिया स्थानीय लोकाधिकार समितीची नवीन कार्यकारिणी अलीकडेच जाहीर झाली. त्या पार्श्वभूमीवर, कोरोना काळातील निर्बंधांचे पालन करत एअर इंडिया, जुना विमानतळ येथील समितीच्या कार्यालयास आमदार विलास पोतनीस यांनी भेट देऊन कामगार आणि कंपनी यांच्या सध्याच्या परिस्थितीचा आढावा घेतला. एअर इंडिया आणि एअर इंडिया इंजिनीअरिंग सर्व्हिसेसमधील कामगारांबाबत केंद्र सरकारचे जाचक धोरण, खासगीकरण, केवळ कंत्राटी कामगारांचीच नोकर भरती, पदोन्नती न करणे, कर्मचाऱयाचा पगार वेळेवर न होणे आणि नुकताच कर्मचाऱयाच्या पीएफच्या रकमेचा घोळ इत्यादी प्रश्न सरचिटणीस प्रशांत सावंत यांनी पोतनीस यांच्या निदर्शनाला आणून दिले. यावेळी समितीचे सल्लागार सुरेश शिंदे, गोपी कदम, विवेक धोत्रे, महासंघाचे उपाध्यक्ष उल्हास बिले, प्रदीप मयेकर, पदाधिकारी योगेश पवार, प्रवीण शिंदे, अमोल कदम, नीलेश शिंदे, राजू भिसे, अनामिका माने, सलील कोटकर, अजित चव्हाण, बाळा कांबळे, रवींद्र कुडाळकर, शिरीष कदम, विनायक वाईरकर, सुनील निंगावले आदी उपस्थित होते.