पोलिसांच्या बदल्यांशी निगडित माहिती सरकारकडून मागणार नाही! सीबीआयची हायकोर्टात हमी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

खंडणीच्या आरोपावरून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सीबीआयने एफआयआर दाखल केला आहे. याप्रकरणी सीबीआयने राज्य सरकारकडे पोलिसांच्या बदल्या तसेच त्यांच्या नेमणुकांबाबत कागदपत्रे मागितली आहेत, मात्र राज्य सरकारने माहिती देण्यास विरोध करत सीबीआयविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दरम्यान, पोलीस अधिकाऱयांच्या बदल्यांबाबत राज्य सरकारकडे 11 जूनपर्यंत माहिती मागणार नाही अशी हमी सीबीआयने आज हायकोर्टाला दिली.

अनिल देशमुखांची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश हायकोर्टाने सीबीआयला दिले होते, मात्र सीबीआयने देशमुखांविरुद्ध गुन्हाच दाखल केला. सीबीआयने दाखल केलेल्या या गुह्याला विरोध करत राज्याच्या गृह विभागाच्या अतिरिक्त सचिवांमार्फत हायकोर्टात एफआयआरविरोधात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर न्यायमूर्ती एस. एस. शिंदे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी, राज्य सरकारवर सदर प्रकरणी कागदपत्रे देण्यासंदर्भात दबाव टाकला जाणार नाही असे सांगितले.

न्यायमूर्तींची दिलगिरी

मुख्य तक्रारदार डॉ. जयश्री पाटील यांनी एप्रिल महिन्यात कोर्टाला याप्रकरणी आपल्याला प्रतिवादी करण्याची मागणी केली. त्यावेळी याचिकेतील मसुदा हा कॉपी पेस्ट केल्याची टिप्पणी न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी केल्यामुळे पाटील यांनी मुख्य न्यायमूर्तींना पत्र लिहीत नाराजी व्यक्त केली. त्या वक्तव्याबाबत न्यायमूर्ती एस. एस. शिंदे यांनी आज दिलगिरी व्यक्त केली.  ते म्हणाले,  हायकोर्टातील कर्मचारी, वकील, न्यायमूर्ती हे कुटुंबासारखे आहेत. जर कधी आमच्याकडून कुणी दुखावले गेल्यास, अपमान झाल्यास आम्ही त्याबाबत दिलगीर आहोत.