
मुंबईत सोमवारपासून शंभर टक्के क्षमतेने बेस्टच्या बसेस चालविण्याची परवानगी मिळाल्याने बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या दोन लाखांनी वाढली आहे. उभे प्रवासी घेण्यास मनाई असल्यामुळे बसस्टॉपवरच्या रांगांमध्ये वाढ झाली आहे.
कोरोना निर्बंध काळात पन्नास टक्के क्षमतेने बेस्टच्या बसेस चालविण्याची परवानगी दिली होती. त्यामुळे एक आसन सोडून प्रवासी घेण्यात येत होते. पन्नास टक्के क्षमतेने या बस तेव्हा सुरू होत्या. 4 जूनपर्यंत त्यामुळे बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 16 लाख 8 हजार होती. सोमवार, 7 जूनपासून शंभर टक्के क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी मिळाली. 7 जून रोजी बेस्टची दैनंदिन प्रवासी संख्या 18 लाख 13 हजार इतकी वाढली असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यामुळे सोमवारी पहिल्या दिवशी बेस्टचे प्रवासी 2 लाख 5 हजाराने वाढले असल्याचे स्पष्ट झाले आहे.





























































