
निवडणूक प्रतिज्ञापत्रात खोटी माहिती देणाऱ्या उमेदवाराला 2 वर्षे तुरुंगवासाची शिक्षा व्हावी, असा प्रस्ताव केंद्रीय निवडणूक आयोगाने तयार केला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळावी अशा आशयाचे पत्र मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी केंद्रीय कायदे मंत्री रवीशंकर प्रसाद यांना लिहिले आहे. सध्या असा गुन्हा करणाऱ्या उमेदवारास 6 महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. हा शिक्षा कालावधी 2 वर्षे करावा आणि अशा उमेदवाराने पुढील 6 वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी करावी, असेही निवडणूक आयुक्त चंद्रा यांनी पत्रात सुचवले आहे. निवडणूक प्रचाराचा शेवटचा टप्पा आणि मतदानाच्या दिवशी उमेदवारांना वर्तमानपत्रातूनही प्रचाराची जाहिरात प्रसिद्ध करण्यास मनाई करावी, अशीही सूचना चंद्रा यांनी कायदेमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात केली आहे.

























































