
पूर्व लडाखच्या सीमेवर लालमाकड चीनच्या कुरापती सुरूच असून, पिपल्स लिबरेशन आर्मीने दोन डझन लढाऊ विमानांसह युद्धसराव केला आहे. यामुळे प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता असून, हिंदुस्थानी लष्कराला अलर्टचा इशारा देण्यात आला आहे.
हिंदुस्थानच्या सीमेलगत चीनने हा युद्धसराव केला. सुमारे दोन डझन जे-11 आणि जे-16 या लढाऊ विमानांचा चीनच्या हवाईदलाने सरावामध्ये समावेश केला होता. चीनच्या हवाईदलाने तिबेट आणि झिनजियांग प्रांतातील वेगवेगळ्या एअरबेसचा वापर युद्ध सरावासाठी केला. यामध्ये गर-गुनसा, काशगर, होपिंग, डोन्गा-जोंग, लिंझी या ठिकाणांचा समावेश आहे. लढाऊ विमानांबरोबरच चिनने हवाई-संरक्षण यंत्रणेचा युद्धसरावात समावेश केल्याचे वृत्त आहे.
हिंदुस्थानचे लष्कर अलर्ट
चिनी सैन्य त्यांच्या भागात तर आपले लष्कर आपल्या भागात युद्धअभ्यास करत आहे. चीनचे सैनिक पुढे येऊ शकतात. त्यामुळे हिंदुस्थानी लष्कर हायअलर्टवर आहे असे लष्करी अधिकाऱयाने सांगितले. दरम्यान, हिंदुस्थानने आपले लढाऊ विमाने तैनात केली आहेत. गेल्या वर्षापासून येथे गस्त वाढविली आहे.


























































