सोलापुरात आता मृत्यू दाखला ऑनलाईन मिळणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शहरातील नागरिकांना महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने यापुढे मृत्यू दाखला ऑनलाइन देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. www.solapurcorporation.gov.in या वेबसाईटच्या होमपेजवरील ऑनलाइन डेथ सर्टिफिकेट या लिंकवर नागरिकांना कोणत्याही कालावधीचा मृत्यू दाखला मिळू शकणार आहे.

मृत्यू दाखला मागणीसाठी ऑनलाइन अर्ज करावा लागेल. अर्जदाराला अर्ज करताना स्वतःचे नाव, पत्ता, आधार क्रमांक, मोबाईल नंबर, ई-मेल आयडी, मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव, मृत्यूची तारीख, मृत्यूचे ठिकाण ही माहिती भरावी लागणार आहे. आधार कार्ड स्कॅन करून अपलोड करावे लागेल. अर्ज केल्यानंतर नागरिकांना त्याची पोहोच मिळेल. एसएमएस किंवा ई-मेलद्वारे त्यांना कळविण्यात येईल. मृत्यू दाखला तयार झाल्यानंतर त्यासाठीचे शुल्क ऑनलाइनच भरावे लागेल. तसे अर्जदाराला कळवले जाईल. हे शुल्क भरल्यानंतर त्याची पावती आणि मृत्यूचा दाखला ऑनलाइन डाऊनलोड करून घ्यावा लागेल.

महापालिकेने यापूर्वी अनेकदा जन्म-मृत्यू दाखले ऑनलाइन देण्याचे जाहीर केले; मात्र त्याची अंमलबजावणी करताना अनेक अडचणी आल्या. आजही नागरिकांना हे दाखले मिळविण्यासाठी बरीच यातायात करावी लागते. महापालिकेत खेटे घातल्याशिवाय दाखले मिळत नाहीत. जन्म आणि मृत्यू हे दोन्ही दाखले महत्त्वाच्या कामासाठी लागतात. ते तातडीने मिळावेत, अशी लोकांची अपेक्षा असते. मात्र, महापालिकेच्या दप्तरी नोंद नाही, हॉस्पिटलने कळवलेले नाही, अशी कारणे सांगून नागरिकांना पिटाळून लावले जाते.