हनीट्रॅप प्रकरणाचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल, दुसऱ्य़ा गुन्ह्यात पुरवणी दोषारोपपत्र सादर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील जखणगाव येथील हनीट्रॅपप्रकरणी दाखल पहिल्या गुन्ह्यातील तीन आरोपींविरोधात आज येथील न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आल्याची माहिती नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी दिली.

आरोपींमध्ये संबंधित महिला, अमोल मोरे (रा. नगर), बापू सोनवणे (रा. हिंगणगाव, ता. नगर) यांचा समावेश आहे. मे महिन्यामध्ये नगर तालुक्यातील जखणगाव येथे हनीट्रॅपचे प्रकरण उजेडात आले होते. येथील एका महिलेने एका व्यापाऱ्य़ाला एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या बदल्यात त्यांनी पाच लाख रुपये संबंधिताला दिल्यानंतर संबंधित महिला व नगरमधील अमोल मोरे याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला होता.

नगर तालुका पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर या प्रकरणामध्ये संबंधित महिला व अमोल मोरे यांना तत्काळ अटक करून त्यांच्या ताब्यातून 2 मोबाईलसह रोकड हस्तगत केली होती. या घटनेच्या तपासामध्ये नगर तालुक्यातील बापू सोनवणे या व्यक्तीचाही यामध्ये समावेश असल्याचे तपासात उघड झाले होते. त्यानंतर पोलिसांनी बापू सोनवणेला अटक केली होती. एक कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणाचा विषय चांगलाच गाजला होता. संबंधित फिर्यादीची सोन्याची चेन, सोन्याच्या अंगठय़ा तसेच 84 हजार तीनशे रुपये रोख असा एकूण 5 लाख 44 हजार रुपयांचा मुद्देमाल हिसकावून घेण्यात आला होता.

या घटनेचा तपास सुरू असतानाच, नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये ‘हनीट्रॅप’चा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. एका प्रथमश्रेणी वर्गातल्या अधिकाऱ्य़ाला 3 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार घडलेला होता. याच व्यक्तींनी खंडणी मागितल्या आहेत, असे निष्पन्न झाले होते.

नगर तालुक्यामध्ये एक कोटी रुपयांची खंडणी मागण्याचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामध्ये संबंधित आरोपी महिला, बापू सोनवणे, अमोल मोरे यांच्या विरोधामध्ये आज नगर न्यायालयामध्ये 82 पानांचे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या दोषारोप पत्रामध्ये तपासाचे महत्त्वाचे सर्व मुद्दे देण्यात आलेले आहेत. त्यांनी खंडणी कशा पद्धतीने मागितली, तीन कोटींच्या प्रकरणात त्यांचा सहभाग आहे का तसेच त्याचे कॉल रेकॉर्डिंगसुद्धा यामध्ये आलेले आहे. याबाबतचेसुद्धा पुरावे या दोषारोप पत्रामध्ये जोडण्यात आलेले आहेत. तसेच, मोरे व अन्य दोघांचे मोबाईल हस्तगत केल्यानंतर ते फॉरेन्सिक लॅबकडे तपासणीसाठी पाठवलेले आहेत.

त्याचा तपास अद्याप होऊ शकलेला नाही. आज न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर यामध्ये पहिल्या गुन्ह्याचे दोषारोपपत्र असून, हेच आरोपी दुसऱ्य़ा गुन्ह्यामध्ये असल्यामुळे आता त्या घटनेचा तपास झाल्यानंतर दुसरे दोषारोपपत्र दाखल होणार आहे.