चिनी ‘जलयुद्धा’चा धोका आणि उपाय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन , [email protected]

ग्रेट बेंड नावाच्या एका शिखराजवळ ब्रह्मपुत्रा नदी वळण घेते आणि हिंदुस्थानच्या अरुणाचल प्रदेशमध्ये प्रवेश करते. तिथे नैसर्गिकरीत्या एक मोठी घळ निर्माण होते. ही घळ 320 किलोमीटर लांब आणि पाच किलोमीटर रुंद आहे. इथे जगातील सर्वात मोठे मेडोंग धरण बांधले जाणार आहे. धरण हिंदुस्थानी सीमेपासून केवळ 330 किलोमीटर दूर आहे. एवढे प्रचंड धरण जर बांधले गेले तर यामुळे ईशान्य हिंदुस्थानची अन्नसुरक्षा आणि पाणी सुरक्षा धोक्यामध्ये येईल. याशिवाय या धरणामध्ये प्रचंड पाणी साठवले जाईल, ज्याचा वापर चीन एक शस्त्र म्हणून करू शकतो. हे प्रकारचे ‘जलयुद्ध’च होऊ शकते.

चीनने आतापर्यंत ब्रह्मपुत्रेवर 6 धरणे बांधलेली आहेत. याशिवाय 28 अजून नवीन धरणे बांधण्याकरिता प्रस्ताव चिनी सरकारसमोर आहे. तो आहे मेडोंग या एका महाकाय धरणाविषयी. ब्रह्मपुत्रा नदीवर जर मोठे धरण बांधले तर त्यामुळे ब्रह्मपुत्रेत येणारे पाणी चीनला कंट्रोल करता येईल . चीन पाण्याचा वापर एक शस्त्र म्हणून अनेक वर्षे करत आहे. 15 जून 2020 मध्ये गलवान खोऱयामध्ये झालेल्या संघर्षामध्ये चीनने नदीचे पाणी हे काही काळाकरिता थांबवले होते.

n सतलज नदी सिंधू नदीची एक उपनदी आहे. ती तिबेटमधून हिमाचल प्रदेशच्या किनवट जिह्यामध्ये येते. 1 ऑगस्ट 2000 रोजी दुपारी दीड वाजता 50 फूट उंच एवढय़ा मोठा पाण्याचा लोट अचानक पारी चू या उपनदीतून सतलजमध्ये तिबेटमधून आला. किनवट, शिमला मंडी हे जिल्हे जे नदीच्या आजूबाजूला आहेत यामध्ये शंभरहून जास्त नागरिक वाहून गेले. 120 किलोमीटर हिंदुस्थान-तिबेट हा महत्त्वाचा रस्ता वाहून गेला, 98 वेगवेगळ्या प्रकारचे नद्यांवर असलेले पूल पूर्णपणे वाहून गेले. म्हणजे अचानक आलेल्या पुरामुळे आपले प्रचंड नुकसान झाले. सवापाच वाजेपर्यंत हे पाणी धरणामध्ये पोहोचले आणि सतलज नदीची पातळी काही क्षणांमध्ये 15 मीटर एवढी वाढली.

– 11 जून 2000 रोजी अरुणाचल प्रदेशात अचानक सियांग नदीची पातळी 100 ते 120 फूट एवढी वर गेली. यात 26 माणसे वाहून गेली, तीन मोठे पूल यामध्ये वाहून गेले आणि या नदीच्या आजूबाजूला असलेल्या चार जिह्यांना पुष्कळ नुकसान सहन करावे लागले. त्यानंतर ‘इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन’ म्हणजे ‘इस्रो’ यांच्या सॅटेलाइट्सनी जी माहिती समोर आणली त्यामध्ये असे दिसले की, तिबेटमध्ये प्रचंड मोठे तलाव निर्माण झाले होते आणि अचानक त्या तलावातले पाणी हिंदुस्थानमध्ये सोडण्यात आले आणि हा मोठा पूर हिंदुस्थानमध्ये आला.

– 2004 मध्ये पारीचू या सतलजच्या उपनदीवर एक मोठे तळे / सरोवर/जलाशय निर्माण झाले होते. चीन याविषयी कुठलीही माहिती देण्याकरिता तयार नव्हता आणि हे पाणी अचानक सोडण्यात आले आणि यामुळे पुन्हा एकदा हिमाचल प्रदेशमध्ये मोठे नुकसान झाले.

– 2012 मध्येसुद्धा अरुणाचलच्या मैदानी भागात, पासीघाट गावात, सियांग नदीचे पाणी काही वेळ पूर्णपणे थांबले. त्यानंतर काही वेळामध्ये प्रचंड वेगाने पाणी येऊ लागले. यामुळे पासीघाटमध्ये पाणी पसरले म्हणजेच पाणी काही काळाकरिता थांबवले गेले आणि अचानक पाणी सोडण्यात आले होते.

– 2017 मध्ये सियांग नदीचे पाणी एकदम काळे झाले आणि 10 इंचाहून जास्त माती नदीच्या पात्राच्या दोन्ही बाजूला दिसून आली. हे पाणी पिण्याच्या किंवा जनावरांनी वापर करण्याच्या लायकीचे नव्हते. त्यामुळे तिथल्या शेतीवर प्रचंड परिणाम झाला. मच्छीमारी पूर्णपणे थांबली. त्यावेळेला चीनने दावा केला होता की, तिथे झालेल्या भूपंपामुळे हे असे झाले असावे, जे पूर्णपणे असत्य होते.

चीनने हिंदुस्थानला ब्रह्मपुत्रा नदीच्या पाणी वाहण्याविषयी माहिती देणे त्यांना बंधनकारक होते ते देणे अनेक वेळा पूर्णपणे थांबवले. असाच प्रकार ज्या वेळेला डोकलाममध्ये चीनची दादागिरी सुरू होती त्या वेळेलासुद्धा आला.

जर ग्रेट बेंड या ठिकाणी चीनने जगातले सर्वात महाकाय धरण निर्माण केले तर त्याचा ईशान्य हिंदुस्थानवर काय परिणाम होईल? काही चिनीप्रेमीतज्ञ सांगण्याचा प्रयत्न करतात, सियांग नदी जी चीनमधून येते ती ब्रह्मपुत्रेला केवळ 30 टक्के पाणी पुरवते आणि ब्रह्मपुत्रेच्या इतर उपनद्या म्हणजे म्हणजे कामेंग, सुबानसरी, लोहित, 70 टक्के पाणी पुरवतात. याशिवाय अरुणाचलमध्ये मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळे या नद्यांना पूर येतो म्हणून काही तथाकथित तज्ञांचे म्हणणे आहे की, केवळ चार टक्के ब्रह्मपुत्रेचे पाणी हे चीनमधून हिंदुस्थानात प्रवेश करते. म्हणून जर ग्रेट बेंड धरण बांधले गेले तर याचा हिंदुस्थानवर फारसा परिणाम होणार नाही.

मात्र हे अतिशय चुकीचे आहे. कारण पावसाळ्यामध्ये पाऊस प्रचंड असल्यामुळे कुठलेही धरण या पाण्याला अडवू शकत नाही आणि ते पाणी वेगाने ब्रह्मपुत्रेचे प्रवेश करून बांगलादेशमध्ये जाते आणि तिथे महापूर येतात. परंतु ज्या वेळेला पावसाळा संपतो त्या वेळेला पाण्याची खरी गरज असते अशावेळी जर पाणी मिळाले नाही तर आपल्याला त्रास होऊ शकतो. म्हणून नदीचे पाणी जर अडवले तर पावसाळ्यानंतर हिंदुस्थानात येणारे पाणी मोठय़ा प्रमाणात कमी होईल आणि हिंदुस्थानची पाणी सुरक्षाही नक्कीच धोक्यात येईल.

हिंदुस्थानने काय पावले उचलावी? अर्थातच हिंदुस्थानने साऊथ ईस्ट एशियाचे देश आणि बांगलादेश यांच्या मदतीने चीनने पाणी थांबवण्याबाबत जागतिक कोर्टात जाणे गरजेचे आहे. ब्रह्मपुत्रेच्या पाण्यावर या नदीच्या वरच्या भागातल्या आणि खालच्या भागातल्या देशांचा बरोबरचा अधिकार आहे. याशिवाय या प्रश्नाला ‘युनायटेड नेशन्स सेक्युरिटी कौन्सिलमध्ये’सुद्धा उठवले जावे. जगातले सगळे देश हे चीनला घाबरत असल्यामुळे किती देश हिंदुस्थानच्या बाजूने बोलतील हे सांगता येणे कठीण आहे. म्हणून हिंदुस्थानला स्वतःहून ही लढाई लढावी लागेल.

युद्धकाळामध्ये ही धरणे हिंदुस्थानी लष्कराला सर्जिकल स्ट्राइक करण्याकरिता अतिशय चांगली टारगेट होऊ शकतील, परंतु युद्ध नसेल त्या वेळेला चीनचे हे पाणीयुद्ध कसे थांबवायचे हे हिंदुस्थानसमोर असलेले मोठे आव्हानच आहे.

आपण ब्रह्मपुत्रा नदीच्या हिंदुस्थानातील उपनद्यांवर धरणे बांधून बिन पावसाळी काळामध्ये लागणाऱया पाण्याची गरज काही प्रमाणामध्ये पूर्ण करू शकतो, परंतु चीनला वठणीवर आणणे हे ईशान्य हिंदुस्थानच्या पाणी सुरक्षा आणि अन्नसुरक्षेकरिता तेवढेच महत्त्वाचे आहे. त्याकरिता चीनविरुद्ध एकत्रित लढाई करून हिंदुस्थानच्या सर्वसमावेशक राष्ट्रीय ताकदीचा वापर करून चीनला अशी धरणे न बांधण्याकरिता भाग पाडणे हे अतिशय महत्त्वाचे आहे.