मुंबईत रविवार, सोमवारी मुसळधार; हवामान विभागाचा अतिवृष्टीचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मान्सूनने आगमनालाच मुंबईला झोपडल्यानंतर आता पुन्हा रविवार आणि सोमवारी शहर व उपनगरांतील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेची यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असून मुंबईकरांनी समुद्र किनारे, किनाऱयालगतच्या परिसरात जाणे टाळावे असे आवाहन पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन खात्याने केले आहे.

कोरोनाच्या दुसऱया लाटेला यशस्वीपणे रोखण्याचे काम सुरू असताना मुंबई महापालिका नागरी सुविधा पुरवण्याचे कामही चोखपणे बजावत आहे. पावसाळ्याच्या तोंडावर येणाऱया आव्हानांचाही यशस्वीपणे मुकाबला करत आहे. मुंबईत बुधवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांतील पाण्याचा निचराही कमी वेळेत झाला. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर, पालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्ष व इतर सर्व नियंत्रण कक्षांना हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून आवश्यक मनुष्यबळ व साधनसामग्रीसह सज्ज आहेत.

  • सखल भागांत साठणाऱया पाण्याचा उपसा करण्यासाठी पर्जन्य जलवाहिन्या विभागाची सहा उदंचन केंद्रे व विविध ठिकाणी बसवण्यात आलेले उदंचन संच कार्यरत आहेत. त्यासाठी आवश्यक डिझेलची व्यवस्था स्थानिक उदंचन संच चालकांकडून करण्यात आली आहे.
  • महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची पूर व बचाव पथके आवश्यक त्या मनुष्यबळासह व साधनसामग्रीसह सहा प्रादेशिक समादेशन केंद्रांवर तैनात आहेत. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथक (एनडीआरएफ) हे आणीबाणी परिस्थिती उद्भवल्यास तत्काळ मदतीकरिता तत्पर आहे. सोबत भारतीय तटरक्षक दल, नौसेनाही सज्ज आहेत.
  • बेस्ट (वाहतूक व विद्युत) आणि अदानी एनर्जी यांना सर्व सबस्टेशन हाय अलर्टवर ठेवण्यात आले असून त्यांची मदत पथके सज्ज व सतर्क आहेत.
  • आणीबाणी मदत यंत्रणांपैकी पोलीस, अग्निशमन दल, वाहतूक पोलीस, बीईएसटी (वाहतूक व विद्युत), शिक्षण खाते, आरोग्य खाते, परिवहन आयुक्त यांच्याशी समन्वय करण्यासाठी पालिकेचा समन्वय अधिकारी महापालिकेच्या मुख्य नियंत्रण कक्षात उपस्थित राहणार आहे.
  • अतिवृष्टीमुळे मिठी नदीच्या पातळीत वाढ होऊन आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाल्यास मिठी नदीच्या आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांचे महापालिकेच्या शाळांमध्ये तात्पुरते स्थलांतर करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे तसेच मदतीकरिता एनडीआरएफची एक तुकडी तिथे तैनात करण्यात आली आहे.