
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. हा तलाव गेल्या वर्षी 5 जुलै 2020 रोजी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला होता. गेल्यावर्षीपेक्षा यंदा हा तलाव सुमारे 24 दिवस आधीच भरून वाहू लागला आहे.
545 कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक वापरासाठी वापरले जाते. गेल्या काही दिवसात या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे हा तलाव भरून वाहू लागला आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयापासून साधारणपणे 27 किलोमीटर अंतरावर हा तलाव आहे. या कृत्रिम तलावाचे बांधकाम 1890 मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे 40 लाख रुपये एवढा खर्च त्या काळात आला होता. या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे 6.61 किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे 2.23 चौरस किलोमीटर एवढे असते. तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये 545.5 कोटी लीटर (5455 दशलक्ष लिटर) पाणी असते. हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी मिठी नदीला जाऊन मिळते.































































